
IND vs AUS: खेळपट्टीबाबत संघ व्यवस्थापनाचा हट्ट; फटका मध्य प्रदेश संघटनेला
India vs Australia Test : नागपूर आणि दिल्लीप्रमाणे इंदूरचा सामनाही तिसऱ्या दिवशी संपला. फरक इतकाच झाला, की पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या खेळपट्टीला आयसीसीने ‘खराब’चा शेरा मारला नाही, जो इंदूरच्या खेळपट्टीला मारला. सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या काही षटकांतच चेंडू पडल्यावर माती उडू लागली होती आणि चेंडू कसाही वळत होता, खाली-वर राहत होता, असा अहवाल देत सामना अधिकारी ख्रीस ब्रॉड यांनी तीन गुण कापले. खेळपट्टीबाबत अट्टहास होता भारतीय संघ व्यवस्थापनाचा; पण त्याचे दुष्परिणाम मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेला भोगावे लागणार आहेत.
इंदूर कसोटी सामन्याला मिळालेल्या दूषणावरून मध्य प्रदेश क्रिकेट संघटना भारतीय संघ व्यवस्थापनावर चांगलीच नाराज झाली आहे. संघटनेच्या दोन निष्णात अनुभवी कर्मचाऱ्यांनी मिळून कमी अवधी असून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी चांगली खेळपट्टी तयार केली होती. तयार केलेली खेळपट्टी फिरकीला साथ देणारीच होती; तरीही भारतीय संघ व्यवस्थापनाने हट्ट करून खेळपट्टी बदलायला लावली, असे ‘सकाळ’ला समजले आहे.
एवढेच नाही, तर नव्याने निवडलेल्या खेळपट्टीवर कमी पाणी मारण्याचाही आग्रह धरला गेला. कर्मचाऱ्यांनी असे करू नका, अशा सूचना देऊनही त्यांचे कोणी ऐकले नाही. परिणामी आयसीसीच्या रोषाचे चटके मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेला सोसावे लागत असल्याने नाराजी आहे.
सामन्यानंतर पत्रकारांनी रोहित शर्माला खेळपट्टीवरून प्रश्न विचारला असता त्याने, भारतीय संघ आपल्या बलस्थानाचा विचार करून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवरच खेळणार असल्याचा पुनरुच्चार केला.
खराब खेळपट्टीचा फटका ऑस्ट्रेलियन संघातील फलंदाजांना बसत आहे, तसा तो भारतीय प्रमुख फलंदाजांनाही बसतो आहे. तीन सामन्यात मिळून प्रमुख फलंदाजांपैकी रोहित शर्माचे पहिल्या कसोटीतील शतक आणि इंदूर कसोटीतील चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक या दोनच जमेच्या बाजू आहेत. अक्षर पटेल एकच असा फलंदाज दोनही संघांपैकी आहे ज्याने खराब खेळपट्टीवरही कमालीचे सातत्य दाखवले आहे.
वैयक्तिक कामगिरी खराब झाली असूनही स्टीव्ह स्मिथ खूश होता. कारण दोन दारुण पराभवांच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संघाने विजय संपादला होता.
स्मिथच्या कर्णधारपदाचे कौतुक झाले. मला भारतात खेळण्याचे आव्हान आवडते. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर प्रत्येक चेंडू म्हणजे मैदानावर घडणारी एक घटना असते. दोन्ही संघ ज्या चाली रचून क्रिकेट खेळतात ते बघता आपण बुद्धिबळाच्या पटावर बसल्याचा भास नेतृत्व करताना होत असल्याचे स्मिथ म्हणाला .
अहमदाबादला स्पोर्टिंग खेळपट्टी?
शेवटचा आणि चौथा कसोटी सामना अहमदाबादला होणार आहे, जिथले मुख्याधिकारी जय शहा असल्याने खेळपट्टीबाबत भारतीय संघ व्यवस्थापन खूप ढवळाढवळ करू शकणार नाही, असे वाटते. भारतीय संघाने तिसरा कसोटी सामनाही जिंकला असता, तर अहमदाबादला किंचित वेगवान गोलंदाजीला मदत करणारी खेळपट्टी बघायला मिळायची शक्यता होती. आता तशी शक्यता मावळली असून फिरकीला मदत करणारीच खेळपट्टी तयार केली जाईल. फरक इतकाच की, अहमदाबादची खेळपट्टी बहुधा पहिल्या षटकापासून रंग दाखवणार नाही.