IND vs AUS Indore Pitch Report : इंदौर कसोटी भारताला देणार धोका; खेळपट्टी पाहून स्मिथचा चेहरा खुलणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS Indore Pitch Report

IND vs AUS Indore Pitch Report : इंदौर कसोटी भारताला देणार धोका; खेळपट्टी पाहून स्मिथचा चेहरा खुलणार?

IND vs AUS Indore Pitch Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाची अवस्था दयनीय झाली आहे. पहिले दोन्ही सामने अडीच दिवसात संपले. भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर कांगारूंची भंबेरी उडाल्याचे दिसले. आता तिसरा कसोटी सामना हा इंदौर येथे 1 मार्चपासून सुरू होत आहे. जाणकारांच्या मते इंदौरची ही भारताची मालिकेत पहिल्यांदा परीक्षा पाहणार आहे.

भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटीत दुखापतींनी बेजार झालेल्या कांगारूंसाठी पुनरागमन करणे हे मोठे आव्हान असणार आहे. मात्र इंदौरच्या खेळपट्टीने त्यांना थोडा दिलासा दिला आहे. इंदौर कसोटीतील खेळपट्टीवर चेंडू चांगल्या प्रकारे बाऊन्स होण्याची शक्यता आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाचा संघ या खेळपट्टीवर मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन यांना खेळवण्याची शक्यता आहे.

या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवसापासून चेंडू फिरकी घेईल. मालिकेत ऑस्ट्रेलियाला विजयाचे खाते उघडण्याची या कसोटीतच चांगली संधी आहे. भारत आतापर्यंत या मालिकेत तीन फिरकीपटू घेऊन खेळत आहे. मात्र या कसोटीत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत मालिकेत फिरकीपटूंनी धुमाकूळ घातला आहे. त्यांनी दोन कसोटीत 52 विकेट्स घेतल्या आहेत. दोन्ही कसोटी सामने तीन दिवसांच्या आत संपवण्यात त्यांना यश आले. मात्र पहिल्यांदाच मालिकेत वेगवान गोलंदाजांचा उत्साह वाढवणारी खेळपट्टी मिळणार आहे. गेल्या वेळी भारतीय संघाने इंदौरमध्ये कसोटी सामना खेळला होता त्यावेळी बांगलादेशविरूद्ध मयांक अग्रवालने द्विसथकी खेळी केली होती.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला भारतीय वेगवान गोलंदाजांनी स्वस्तात गुंडाळले होते. भारताने ही कसोटी देखील तीन दिवसात संपवली होती. या कसोटीत वेगवान गोलंदाजांनी आपला दबदबा निर्माण केला होता. या स्टेडियमवर फारसे कसोटी सामने झालेले नाही. वनडे आणि टी 20 सामन्यांचा विचार करता एक गोष्ट निश्चित आहे की फलंदाज इथे फार फंलदाजीचा आनंद घेतील.

मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनने होळकर स्टेडियमची खेळपट्टी तयार करण्यासाठी खास मुंबईवरून लाल माती आणली होती. ऑस्ट्रेलियाने मुंबईत बरेच क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या चांगलीच पथ्यावर पडेल. लाल माती ही विटांचा चुरा करून तयार केली जाते. लाल मातीची ही खेळपट्टी टणक असते. त्यामुळे यावर चेंडू चांगला बाऊन्स होतो. याचा प्रत्यय आपल्या वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर येतो.

मात्र सामना जसजसा पुढे जाईल तसतचे गोलंदाजांच्या स्पाईकमुळे खेळपट्टीवर रफ पॅचेस तयार होतात. याचा फायदा फिरकीला होतो. विशेषकरून रविचंद्रन अश्विनसाठी ही परवणी ठरणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही