IND vs AUS : टीम इंडियाचे चिंता वाढली! दिग्गज खेळाडू कसोटीनंतर ODI मालिकेतून बाहेर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test and odi Team India worries increased Shreyas Iyer out of ODI series after Test

IND vs AUS : टीम इंडियाचे चिंता वाढली! दिग्गज खेळाडू कसोटीनंतर ODI मालिकेतून बाहेर?

IND vs AUS ODI : भारतीय क्रिकेट संघात खेळाडूंच्या दुखापतींचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला आहे. जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे मागील वर्षापासून क्रिकेटपासून दूर असतानाच आता श्रेयस अय्यरही पाठीच्या दुखण्याने बॅकफूटवर गेला आहे. अहमदाबादमधील कसोटीच्या पहिल्या डावात त्याने फलंदाजी केली नसून आता १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेलाही तो मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बीसीसीआय कडून त्यावेळी स्पष्टीकरण देण्यात आले की, चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसानंतर अय्यरला पाठीची दुखापत उद्भवली असून त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

याप्रसंगी एका माजी निवड समिती सदस्याने 'पीटीआय'शी संवाद साधताना परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, श्रेयस अय्यरला याआधीही दुखापतीमधून जावे लागले आहे. या कसोटीत तो जवळपास १७० षटके क्षेत्ररक्षण करीत होता. त्यानंतर पुन्हा त्या दुखापतीने डोके वर काढले. एखादा खेळाडू दुखापतीमधून बरा होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत असेल तर त्याला स्थानिक क्रिकेट खेळणे गरजेचे आहे. याआधी हा नियम होता. याचा अवलंब आताही व्हायला हवा, असे त्यांना वाटते.

आयपीएल अन् विश्वकरंडक

श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असल्यास भारतासाठी, तसेच कोलकाता नाईट रायडर्ससाठीही ही धोक्याची घंटा ठरू शकते. ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघामधून अय्यर खेळणार आहे. बुमरा व अय्यरची पाठीची दुखापत, रिषभ पंतचा कारचा अपघ यामुळे भारतीय संघाला तीन प्रमुख खेळाडूंना सध्या मुकावे लागत आहे.