
IND vs AUS: ख्वाजा भाऊने रोहित सेनेला दिवसभर रडवलं! शेवटी शेपूटही वळवळलं
Ind vs Aus test Day 2 : तीन सामन्यांतील कोरड्या खेळपट्टीचा धुरळा खरी धुळवड झाल्यावरच थांबला. अहमदाबाद कसोटी सामन्याकरिता तयार केलेल्या खेळपट्टीने फलंदाजांना कडेवर घेतले. उसळी नसणाऱ्या आणि गोलंदाजी करताना चेंडूचा टप्पा पडल्यावर संथ वेगाने येणाऱ्या खेळपट्टीने भारतीय गोलंदाजांची परीक्षा बघितली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 480 धावा केल्या.
आज ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सवर 255 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीननी पाचव्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो 170 चेंडूत 114 धावा करून बाद झाला. अश्विनने ग्रीनला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. त्याच षटकात अश्विनने अॅलेक्स कॅरीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीला खातेही उघडता आले नाही.
यानंतर ऑस्ट्रेलियाला 387 धावांवर सातवा धक्का बसला. रविचंद्रन अश्विनने मिचेल स्टार्कला झेलबाद केले. स्टार्कला सहा धावा करता आल्या. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून 409 धावा केल्या होत्या. चहापानानंतर पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाला अक्षर पटेलने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने 422 चेंडूत 180 धावा केल्या आणि आऊट झाला.
यानंतर नॅथन लियॉन आणि टॉड मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. अश्विनने मर्फी (41) ला एलबीडब्ल्यू आणि नंतर लायन (34) कोहलीच्या हाती झेल देऊन ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आणला.
अश्विनने या डावात एकूण सहा विकेट घेतल्या. 32व्यांदा त्याने कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी त्याने भारतीय भूमीवर 26व्यांदा ही कामगिरी केली. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्यांदा कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. कांगारूंविरुद्धच्या कसोटीत त्याने आतापर्यंत 113 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनशिवाय शमीला दोन बळी घेतल्या. त्याचवेळी अक्षर-जडेजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.