
Jasprit Bumrah : बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया! IPL मधून बाहेर; आता थेट वर्ल्डकपमध्ये खेळणार?
Jasprit Bumrah : रिषभ पंतचा कारचा अपघात व जसप्रीत बुमराची पाठीची दुखापत ही भारतासाठी क्लेशदायक ठरत आहे. पंत सध्या दुखापतीवर उपचार घेत असून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी एक ते दोन वर्षे लागणार आहेत.
आता बुमराच्या दुखापतीबद्दलही अपडेट आले असून त्यानुसार त्याच्या पाठीच्या दुखण्यावर न्यूझीलंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता ऑगस्ट महिन्यापर्यंत त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे. याचा अर्थ तो थेट आता भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर यादरम्यान होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडकात खेळू शकणार आहे.
बुमरा दुखापत व शस्त्रक्रियेमुळे मागील वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यातच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएललाही तो मुकणार आहे. याचा फटका मुंबई इंडियन्सला बसेल.
त्यानंतर जून महिन्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी अजून गाठलेली नाही, पण टीम इंडियाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यास त्या सामन्यालाही तो मुकेल. एवढेच नव्हे, तर आशियाई करंडकातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह असणार आहेत.
न्यूझीलंडचे ऑर्थोपेडिक सर्जन रोवन स्काऊटेन यांनी बुमरावर शस्त्रक्रिया केली. याआधी त्यांनी जेम्स पॅट्टीनसन, जेसन बेहेरनडोर्फ व जोफ्रा आर्चर या गोलंदाजांवर शस्त्रक्रिया केली होती.
त्यामुळे बुमराच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी रोवन यांची निवड करण्यात आली. दरम्यान, एकदिवसीय विश्वकरंडकाआधी बुमरा ऑगस्ट महिन्यात सरावाला सुरुवात करणार आहे.
दुखापतीचा काळ
२०२२ मधील ऑगस्ट महिन्यात पाठीच्या दुखापतीमुळे आशिया करंडकामधून माघार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-२० लढतींमध्ये सहभाग
ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वकरंडकासाठी संभाव्य चमूत संधी
पुन्हा पाठीच्या दुखण्याचा त्रास
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापत गंभीर असल्याचे समजले
टी-२० विश्वकरंडकात न खेळण्याचा निर्णय
२०२२ मधील डिसेंबर महिन्यात गोलंदाजीला पुन्हा सुरुवात
२०२३ मधील जानेवारी महिन्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सामन्याच्या सरावाला सुरुवात
मात्र फिटनेस ड्रिल करताना पुन्हा दुखापत उद्भवल्याचे समजले
श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधून माघार
२०२३ मधील मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया
ऑगस्टपर्यंत पूर्ण विश्रांती, त्यानंतर गोलंदाजीला सुरुवात