IND vs AUS: ‘कसोटी क्रिकेटला...' इंदूर खेळपट्टीवर दिग्गज खेळाडूंची जोरदार टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test matthew-hayden-criticizes

IND vs AUS: ‘कसोटी क्रिकेटला...' इंदूर खेळपट्टीवर दिग्गज खेळाडूंची जोरदार टीका

India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून इंदूरच्या होळकर मैदानावर सुरू झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी १४ फलंदाज बाद झाले. सुरुवातीलाच हातभर चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी जोरदार टीका केली. अशा प्रकारची खेळपट्टी कसोटी क्रिकेटला मारक असल्याचे मत त्यांनी मांडले.

मातब्बर फलंदाज असलेल्या भारताचा पहिला डाव अवघ्या ३३ षटकांत १०९ वर संपल्यामुळे हेडन यांच्या टीकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑस्ट्रेलियासाठी विणण्यात आलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजच अडकले.

हेडन हे भारतात या मालिकेचे समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सहावे षटक फिरकी गोलंदाज टाकू शकतो म्हणजे खेळपट्टी कशा स्वरूपाची असेल, हे स्पष्ट होते. पहिल्या अर्ध्या तासात चेंडू वळत होता आणि खालीही रहात होता. त्यामुळे अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटीसाठी चांगल्या नाहीत, असे हेडन यांनी म्हटले आहे.

कसोटी सामना किमान चार दिवस तरी चालला पाहिजे; मात्र अशा प्रकारे जर झटपट विकेट जात राहिल्या, तर प्रेक्षकांबाबतही मला दुःख आहे. हा कसोटी सामना चार दिवस चालेल असे वाटत नाही, असे हेडन यांनी सांगितले.