
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघासाठी वाईट बातमी! कांगारू कर्णधारावर कोसळला दुःखाचा डोंगर
Pat Cummins Mother Died : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान पाहुण्या संघासाठी वाईट बातमी आली आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सची आई मारिया यांचे निधन झाले आहे. ती काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती.
दिल्ली कसोटीनंतर पॅट कमिन्स आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला परतला होता. अहमदाबाद कसोटीपूर्वी कमिन्स भारतात परतेल अशी अपेक्षा होती. पण आईची प्रकृती खालावल्याने त्यांनी सिडनीतच राहण्याचा निर्णय घेतला. इंदूर येथील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथने केले आणि कांगारू संघाने हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “मारिया कमिन्सच्या निधनाने आम्ही दु:खी आहोत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने आम्ही पॅट कमिन्स कुटुंब आणि त्यांच्या मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. पॅट कमिन्सच्या आईला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काळ्या हाताची पट्टी बांधणार आहे.