IND vs AUS Virat Kohli : विराटच्या 75व्या आंतरराष्ट्रीय शतकाने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS Virat Kohli

IND vs AUS Virat Kohli : विराटच्या 75व्या आंतरराष्ट्रीय शतकाने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

IND vs AUS Virat Kohli : विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतक ठोकले. कोहलीचे हे कसोटीतील 28वे शतक आहे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 75वे शतक आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात कोहलीने ही उत्कृष्ट खेळी खेळली.

कोहलीने 241 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. तब्बल 3 वर्षांनी त्याने कसोटीत शतक झळकावले आहे. यापूर्वी विराट कोहलीने 22 नोव्हेंबर 2019 रोजी कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक झळकावले होते. कोहलीने कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर पिंक बॉल कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध 139 धावांची खेळी केली होती.

विराट कोहलीचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे 16 वे शतक आहे तर अनुभवी सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 शतके झळकावली आहेत.

विराट कोहलीने वेडिंग रिंगला किस करून शतक साजरे केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे आठवे कसोटी शतक आहे. या यादीत सचिन 11 शतकांसह पहिल्या तर अनुभवी सुनील गावसकर 8 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीने मायदेशावर कसोटीत 4 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. देशात कसोटीत 4000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा कोहली हा पाचवा भारतीय ठरला आहे.