esakal | ओली पोपने केली भारतीय गोलंदाजांची धुलाई; इंग्लंडला मिळाली आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Ollie-Pope-1

ओली पोपने केली भारतीय गोलंदाजांची धुलाई; इंग्लंडला मिळाली आघाडी

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng 4th Test: जॉनी बेअरस्टो, मोईन अलीनेही केल्या उपयुक्त खेळी

Ind vs Eng 4th Test: भारताचा (Team India) पहिला डाव १९१ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडचा पहिला डावही गडगडला होता. पण चौथ्या कसोटी सामन्यात संधी मिळालेल्या ओली पोपने संधीचे सोनं केलं. इंग्लंडच्या संघाने ६२ धावांच्या मोबदल्यात ५ गडी गमावले होते. सगळे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर ओली पोपने आधी जॉनी बेअरस्टोच्या साथीने आणि नंतर मोईन अलीच्या साथीने इंग्लंडच्या डावाला आकार दिला. एकेवेळी फॉलोऑनच्या संकटात असलेल्या इंग्लंडला ओली पोपने त्या संकटातून तर काढलंच पण त्यासोबतच भारतावर पहिल्या डावात आघाडीही मिळवून दिली. ओली पोपने दमदार अर्धशतक झळकावले. बेअरस्टोसोबत ८९ धावांची तर मोईन अलीसोबत ७१ धावांची भागीदारी करत ओली पोपने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे चहापानाच्या विश्रांतीपर्यंत पोपने (नाबाद ७४) इंग्लंडला भारतावर ३६ धावांची आघाडी मिळवून दिली.

त्याआधी, भारताचा डाव १९१ धावांवर आटोपला. बडे खेळाडू झटपट बाद झाले. विराट कोहलीने झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर शार्दूल ठाकूरने ३६ चेंडूत केलेल्या ५७ धावांच्या खेळीमुळे भारताला १९१ पर्यंत मजल मारता आली. भारतानंतर इंग्लंडच्या डावाचीही सुरूवात खराबच झाली. रॉरी बर्न्स (५) आणि हसीब हमीद (०) हे इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर एकाच षटकात स्वस्तात बाद झाले. चांगल्या लयीत असलेला कर्णधार जो रूटही (२१) लवकर बाद झाला. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात डेव्हिड मलान (३१) आणि क्रेग ओव्हरटन (१) हेदेखील स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर ओली पोपने भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

loading image
go to top