
IND vs PAK ODI News: भारत-पाकिस्तान संघात सप्टेंबरमध्ये होणार 3 वनडे! वेळापत्रकात मोठा बदल
Asia Cup 2023 India vs Pakistan : कोणत्याही खेळात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना म्हटलं की उत्सुकता शिगेला पोहोचते. विशेषत: क्रिकेटचे मैदान असेल तर हा थरार आणखीनच वाढतो. या दोन शेजारी देशांमधील सामना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये पोहोचतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन देशांदरम्यान कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही.
भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असूनही दोघांमधील संबंध खराब झाले आहे. याचा परिणाम खेळावरही झाला.या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. भारतीय संघाने 17 वर्षांपूर्वी पाकिस्तानचा दौरा केला होता, तेव्हापासून दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशिया चषकाच्या मंचावर एकमेकांसमोर खेळतात. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आगामी आशिया चषक 2023 मध्ये खेळण्यावरून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळांमधील वाद आता मिटण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले असल्याचा दावा क्रिकबझच्या अहवालात करण्यात आला आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल होऊ शकतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये एक-दोन नव्हे तर तीन सामने होऊ शकतात. या दोन्ही संघांना 6 देशांच्या आशिया चषक स्पर्धेतील क्वालिफायर संघासह गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ दुसऱ्या गटात आहेत. आशिया चषक स्पर्धेत 13 दिवसांत अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने खेळवले जातील. 2022 आशिया कप फॉरमॅटमध्ये प्रत्येक गटातील शीर्ष 2 संघ सुपर-4 मध्ये पोहोचले त्यानंतर शीर्ष 2 संघ अंतिम फेरीत भिडले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने पाकिस्तानच्या भूमीवर खेळवले जाणार नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे. हे सामने कुठे होतील, हे अद्याप ठरलेले नाही. परंतु UAE, ओमान, श्रीलंका आणि अगदी इंग्लंडलाही किमान दोन भारत-पाकिस्तान सामन्यांसह 5 सामन्यांचे यजमानपद भूषवण्याचे संभाव्य दावेदार असल्याचे सांगितले जात आहे.