आशियाई कॅडेट कुस्तीत रविंदरला सुवर्णपदक

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

आशियाई कॅडेट अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताने दोन सुवर्णांसह 3 रौप्य आणि 14 ब्रॉंझ अशी एकूण 19 पदके मिळविली. अखेरच्या दिवशी फ्री-स्टाईल प्रकारात रविंदरने (60 किलो) भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अखेरच्या दिवशी भारताचा अनिरुद्ध (110 किलो) रौप्य, तर सौरभ मधुकर (48 किलो), पविंदर (55 किलो), मोनु दहिया (92किलो) यांनी ब्रॉंझपदकाची कमाई केली. 
 

ताश्‍कंद (उझबेकिस्तान) - आशियाई कॅडेट अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताने दोन सुवर्णांसह 3 रौप्य आणि 14 ब्रॉंझ अशी एकूण 19 पदके मिळविली. अखेरच्या दिवशी फ्री-स्टाईल प्रकारात रविंदरने (60 किलो) भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अखेरच्या दिवशी भारताचा अनिरुद्ध (110 किलो) रौप्य, तर सौरभ मधुकर (48 किलो), पविंदर (55 किलो), मोनु दहिया (92किलो) यांनी ब्रॉंझपदकाची कमाई केली. 

भारताच्या रविंदरने कोरियाच्या सूयेओल पार्क याच्यावर गुणांनी विजय मिळवून झकास सुरवात केली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने जपानच्या यामातो हागिवारा याचे आव्हान गुणांवरच संपुष्टात आणले. उपांत्य फेरीत चित्र फार काही वेगळे नव्हते. रविंदरने किर्गिझस्तानच्या अमिस जॉर्जेलानी याचे आव्हान गुणांवरच मोडून काढले. अंतिम फेरीत रविंदरने तेच सातत्य आणि नियोजन कायम ठेवत कझाकस्तानच्या इस्सायु मुख्तारली याला गुणा 8-1 असे पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. 

भारतीय मुलींनीही या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि पाच ब्रॉंझपदके पटकावली. मुलींचे हे यश नक्कीच सुखावणारे होते अशी प्रतिक्रिया संघाचे प्रशिक्षक राम पवार यांनी दिली. ते म्हणाले, ""संघातील अनेक मुली नव्या होत्या. त्यांच्याकडे अनुभवाची कमी होती. यानंतरही त्यांनी केलेली कामगिरी, मिळविलेली पदके मला समाधान देणारी आहेत. या मुलींकडे गुणवत्ता भरपूर आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक खेळण्याची संधी मिळाल्यास त्या नक्कीच प्रगल्भ होतील. या स्पर्धेतून भारताला भविष्याच्या दृष्टिने दुसरी फळी मिळाली असे म्हणता येईल.'' 

Web Title: India’s Ravinder wins gold at Asian Cadet Wrestling Championships