चिली ओपन टे. टे. स्पर्धेत भारताचा सौम्यजित विजेता 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या चॅलेंजर मालिकेत प्रथमच भारताने पुरुष एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे. ही स्पर्धा जिंकणारा सौम्यजित तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी शरथ कमाल आणि जी. साथीयन यांनी अशी कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली - भारताच्या सौम्यजित घोष याने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या चॅलेंजर मालिकेतील चिली ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला. चॅलेंजर स्पर्धेत एखाद्या भारतीय खेळाडूने दुहेरी विजेतेपद मिळविण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 

एकेरीत अव्वल मानांकन मिळालेल्या सौम्यजितने अंतिम लढतीत आपलाच सहकारी अँथनी अमलराज याचा 8-11, 13-11, 11-6, 11-9, 4-11, 11-7 असा पराभव केला. त्यापूर्वी सौम्यजितने अमलराजच्याच साथीत दुहेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी फिलिप फ्लोरिट्‌झ-हुनोर झॉक्‍स यांचा 13-11, 12-10, 14-12, 11-9 असा पराभव केला. 

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या चॅलेंजर मालिकेत प्रथमच भारताने पुरुष एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे. ही स्पर्धा जिंकणारा सौम्यजित तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी शरथ कमाल आणि जी. साथीयन यांनी अशी कामगिरी केली आहे. भारताला यापूर्वी दोनदा दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. भारतातच 2009 मध्ये इंदूर येथे झालेल्या स्पर्धेत शरत कमाल-सुभाजित साहा यांना सिंगापूरच्या गाओ निंग-यांग झी, तर सौम्यजित घोष-हरमीत देसाई यांना ऑस्ट्रेलियात हॉंगकॉंगच्या हो क्वान किट-लॅम सिउ हॅंग यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. 

Web Title: India’s Soumyajit Ghosh wins singles, doubles at Chile Open table tennis