चिवट प्रतिकारानंतरही बांगलादेशचा पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

भारतात पहिलीच कसोटी खेळणारा बांगलादेश मायदेशात एकतर्फी वर्चस्व राखणाऱ्या कोहली सेनेला पाचव्या दिवसापर्यंत झुंजविले. काही महिन्यांपासून चौथ्या दिवशी विजय स्पष्ट करण्याची सवय लागलेल्या भारतीय संघास बांगलादेशने पाचव्या दिवसापर्यंत नेले.

हैदराबाद - विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे विजय अभियान बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही कायम राहिले असून, भारतीय संघाने बांगलादेशचा 208 धावांनी पराभव केला. या विजयामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे.

भारतात पहिलीच कसोटी खेळणारा बांगलादेश मायदेशात एकतर्फी वर्चस्व राखणाऱ्या कोहली सेनेला पाचव्या दिवसापर्यंत झुंजविले. काही महिन्यांपासून चौथ्या दिवशी विजय स्पष्ट करण्याची सवय लागलेल्या भारतीय संघास बांगलादेशने पाचव्या दिवसापर्यंत नेले. पहिल्या डावातील त्रिशतकी आघाडीघेऊनही भारताने फॉलोऑन टाळला; पण बांगलादेशसमोर 458 धावांचे अवघड लक्ष्य ठेवले. या आव्हानासमोर बांगलादेशचा दुसरा डाव आज दुपारच्या सत्रात 250 धावांत संपुष्टात आला. बांगलादेशच्या फलंदाजांना बाद करताना भारतीय गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागली. 

पहिल्या तीन दिवसांत बारा फलंदाज बाद झाल्यावर चौथ्या दिवशी 11 फलंदाज बाद झाले. राजीव गांधी स्टेडियमवरील खेळपट्टीवर अजूनही फलंदाजी अशक्‍य नसल्यामुळे भारताने फॉलोऑन टाळला; पण त्याच वेळी आपल्या गोलंदाजांना बांगलादेशला बाद करण्यासाठी चार सत्रे कोहली ठेवणार हे स्पष्ट होते. कोहलीने बांगला फलंदाजांना सव्वाशे षटके खेळण्याचे आव्हान दिले. चौथ्या दिवसअखेर 3 बाद 103 धावा करणाऱ्या बांगलादेशला आज (सोमवार) अखेरच्या दिवशी सुरवातीलाच जडेजाने शाकीबला बाद करत पहिला धक्का दिला.

पहिल्या डावातील शतकवीर मुशफिकूर रहिम दुसऱ्या डावात अपयशी ठरला. त्याला आश्विनने 23 धावांवर बाद केले. शब्बीर रेहमानही 22 धावांवर ईशांतचा शिकार ठरला. मेहमुदुल्लाहने एकाकी झुंज देत अर्धशतक पूर्ण केले. पण, 64 धावांवर असताना ईशांतने त्याचा अडसर दूर केला. मेहदी हसन आणि कमरुल इस्लाम यांनी काहीकाळ प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, जडेजाने हसनचा अडसर दूर केला. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी बांगलादेशचा डाव गुंडाळला. भारताकडून जडेजा आणि आश्विनने प्रत्येकी चार बळी मिळविले.

Web Title: india beat bangladesh in hyderabad test