INDvBAN : अवघ्या 45 मिनिटांत विजयावर शिक्कामोर्तब!

सुनंदन लेले
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

दोन्ही डावात मिळून 9 फलंदाजांना तंबूत धाडणार्‍या ईशांत शर्माला सामन्याचा आणि मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.

कोलकाता : भारत आणि बांगलादेश दरम्यान ऐतिहासिक ईडन गार्डनवर खेळला गेलेला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना क्रिकेट जगतात आणि भारतीय प्रसार माध्यमात प्रचंड प्रसिद्धी मिळणारा ठरला.

- #INDvBAN:गुलाबी चेंडूवर भारताचा बांग्लादेशला 'व्हाईट वॉश'

भारतीय संघाने पाहुण्या बांगलादेश संघाचा दुसरा डाव तिसर्‍या दिवशी खेळ चालू झाल्यानंतर अवघ्या 45 मिनिटांत 195 धावांवर संपवून एक डाव आणि 46 धावांच्या विजयावर शिक्का मारला. दोन्ही डावात मिळून 9 फलंदाजांना तंबूत धाडणार्‍या ईशांत शर्माला सामन्याचा आणि मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.

सामन्यातील निकाल लागण्यात केवळ औपचारिकता बाकी असूनही कोलकात्याच्या जवळपास 30 हजार प्रेक्षकांनी ईडन गार्डनवर हजेरी लावली. भारतीय संघाला विजयी होताना प्रेक्षकांना बघायचे होते. तसेच भारताच्या पहिल्या पिंक बॉल कसोटी सामन्याचे साक्षीदार व्हायचे होते. खेळाला प्रारंभ झाल्यावर उमेश यादवने इबादत हुसेनला आखूड टप्प्याचा चेंडू टाकून बाद केले, तेव्हा हळुवार उडालेला झेल विराट कोहलीने आरामात पकडला.

- INDvBAN : 'विराट' शतकासह कोहलीची सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी

थोडातरी सामन्याचा आनंद मिळावा म्हणून प्रेक्षक मुशफिकूर रहीमला आवाजी पाठिंबा देऊ लागले. मुशफिकूरला त्याचे मोल असल्याचे दिसले नाही. उमेश यादवला मोठा फटका मारायच्या नादात त्याने 74 धावा करून विकेट बहाल केली. तीन तास मुशफिकूरने खिंड लढवली म्हणून सामना इतका तरी लांबला हे मान्य करावेच लागेल.

- INDvBAN : 'एक ही दिल है विराट भाई, कितनी बार जितोगे!'

सामन्यात 10 बळी मिळायची संधी मिळावी म्हणून विराट कोहलीने ईशांतला परत गोलंदाजीला बोलावले. परंतु ईशांतने नव्हे, तर उमेश यादवने अल् अमीन हुसेनला बाद करून बांगलादेशचा डाव 195 धावांवर संपवला. उमेश यादवने 5 आणि ईशांतने 4 फलंदाजांना बाद केले. विजयानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी ईडन गार्डनवरील रसिक प्रेक्षकांना अभिवादन केले. क्रिकेट सामन्यात दम नसून कोलकात्याच्या प्रेक्षकांनी तीनही दिवस मैदानावर लावलेली भरघोस हजेरी चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India beat Bangladesh by an innings and 46 runs