विंडीजच्या माफक आव्हानासमोर भारताची झाली दमछाक 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

रोहित शर्मा, शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांच्यावर फलंदाजी आधारलेली होती; परंतु रोहित (6), धवन (3), राहुल (16) पंत (1), मनीष पांडे (19) बाद झाले तेव्हा काजवे चमकले होते; परंतु कार्तिकने अनुभव पणास लावला आणि कृणालने पहिल्याच सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध केली. या दोघांनी 16 चेंडूंत नाबाद 27 धावांची भागीदारी केली. 

कोलकता : विराट कोहलीची विश्रांती, धोनीला दिलेला निरोप, त्यातच रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर माफक आव्हानासमोरही कठीण झालेल्या परिस्थितीतून अखेर अनुभवी दिनेश कार्तिकने संघाला सहीसलामत बाहेर काढले आणि भारताने पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा 5 विकेटने पराभव केला. 

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीने पुन्हा एकदा वेस्ट इंडीज फलंदाजांना शरण आणले, त्यामुळे 20 षटकांत त्यांना केवळ 109 धावाच करता आल्या; परंतु या आव्हानासमोरही दमछाक झाली. दिनेश कार्तिकच्या नाबाद 31 धावा आणि पदार्पण करणाऱ्या; परंतु आयपीएलचा मोठा अनुभव असलेल्या कृणाल पंड्याची 9 चेंडूंतील नाबाद 21 धावांची खेळी बहुमोल ठरली. 

रोहित शर्मा, शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांच्यावर फलंदाजी आधारलेली होती; परंतु रोहित (6), धवन (3), राहुल (16) पंत (1), मनीष पांडे (19) बाद झाले तेव्हा काजवे चमकले होते; परंतु कार्तिकने अनुभव पणास लावला आणि कृणालने पहिल्याच सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध केली. या दोघांनी 16 चेंडूंत नाबाद 27 धावांची भागीदारी केली. 

तत्पूर्वी, एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातलेल्या वेस्ट इंडीज फलंदाजीत काही अनुभवी चेहरे आले; परंतु भारतीयांसमोरची दाणादाण कायम राहिली. पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजचा डाव 8 बाद 109 धावांवर मर्यादित राहिला. 
चायनामन कुलदीप यादवच्या फिरकीचे कोडे विंडीज फलंदाजांना अजून उलगडलेले नाही. 13 धावांत त्याने तीन विकेट मिळवल्या. त्याअगोदर बुमरा आणी उमेश यादव यांनी सुरुंग लावला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडीजची सुरवातच मुळात अडखळती होती. उमेशने रामदीनला बाद केले. त्यानंतर शई होप आणि हेटमेएर या फॉर्मात असलेल्या जोडीत ताळमेळ राहिला नाही. होप धावचीत झाला; तर बुमराच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर वेगात आणि उंच फटका मारण्याचा हेटमेरचा प्रयत्न फसला. 5 षटकांत 3 बाद 28 अशा अवस्थेनंतर विंडीजला आक्रमणाऐवजी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. 

संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडीज ः (शई होप 14- 10 चेंडू, 3 चौकार, हेटमेएर 10- 7 चेंडू, 2 चौकार, किएरॉन पोलार्ड 14- 26 चेंडू, 1 षटकार, फॅबिन अलेन 27- 19 चेंडू, 4 चौकार, खलील अहमद 4-1-16-1, कृणाल पंड्या 4-0-15-1, कुलदीप यादव 4-0-13-3). पराभूत वि. भारत ः 17.5 षटकांत 5 बाद 110 (दिनेश कार्तिक नाबाद 31- 34 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, कृणाल पंड्या नाबाद 21- 9 चेंडू, 3 चौकार, थॉमस 4-0-21-2, ब्राथवेट 4-1-11-2). 

Web Title: India beat west indies by 5 wickets