सलामीच्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला सलामीच्या लढतीतच 36-20 असे सहज पराभूत करत कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेची दणदणीत सुरुवात केली. 

दुबई: भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला सलामीच्या लढतीतच 36-20 असे सहज पराभूत करत कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेची दणदणीत सुरुवात केली. 

सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत भारतीय संघाने विजयाचा मार्ग मोकळा केला. कर्णधार अजय ठाकूरच्या बहारदार खेळाच्या जोरावर भारतीय संघाने मध्यंतरालाच 22-9 अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. 
या बलाढ्या आघाडीमुळे खचलेल्या पाकिस्तानच्या संघाने पुनरागमनाचे प्रयत्नदेखील केले नाहीत. ठाकुरने त्याच्या चढाईमध्ये 15 गुण कमवत संघाला पहिल्या सत्रात आघाडी मिळवून दिली. सामना सुरु झाल्यावर पहिले दहा मिनिटे संथ खेळ केल्यानंतर भारतीय संघाने गिअर बदलत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. 

या विजयाचे पूर्ण श्रेय ठाकूरला देताना भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणाले, ''त्याने पाकिस्तानचे दोन्ही कॉर्नर आणि बचाव फळीचा खात्मा केला''.
पहिल्या कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे केंद्रिय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोर म्हणाले, ''कबड्डीमध्ये ऑलिम्पिक सहभागासाठी लागणारे वेग, चपळाई, सामर्थ्य, आणि सांघिक कामगिरी असे सर्व निकष आहेत. त्यामुळे जेव्हा कबड्डी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल तेव्हा भारत कबड्डीतील पहिले पदक जिंकेल''. 

Web Title: India beats pakistan in kabaddi match