फलंदाजांच्या शरणागतीमुळे भारताचा टी-20 पराभव 

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

भारतीयांची फलंदाजी आज कोलमडली आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने दुसरा ट्‌वेन्टी-20 सामना आठ विकेटने जिंकला.

 

गुवाहाटी - ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आल्यापासून जवळपास प्रत्येक सामन्यात बहरणारी भारतीयांची फलंदाजी आज कोलमडली आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने दुसरा ट्‌वेन्टी-20 सामना आठ विकेटने जिंकला. याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 

प्रथम फलंदाजी मिळालेल्या भारताला सहा धावांच्या सरासरीचेही आव्हान उभे करता आले नाही. 118 धावांत सर्व संघ गारद झाला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 15.3 षटकांत पार केले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार त्यानंतर आणखी एक चेंडू सीमापार धाडून रोहित शर्माने जोरदार सुरवात केली; परंतु चौथ्याच चेंडूवर तो बाद झाला. दोन चेंडूंनंतर विराटही माघारी फिरला आणि तेथूनच भारतीय संघाच्या फलंदाजीचेही दैवही माघारी फिरले. डावखुरा वेगवान गोलंदाज बेहरेंडॉफने 21 धावांत 4 बळी मिळवून भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. 4 बाद 27 अशी दैना झालेला डाव केदार जाधव आणि हार्दिक पंड्या यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. लेगस्पिनर ऍडम झंपाने संधी दिली नाही. 

गोलंदाजीस उतरल्यावर ऑस्ट्रेलियाचे सलामीवर वॉर्नर आणि फिन्च यांना बाद करून भारतीयांनी स्फूर्ती मिळवली खरी; परंतु हेन्रिकेस आणि हेड यांनी भारतीयांना डोके वर काढू दिले नाही. 

संक्षिप्त धावफलक 
भारत 20 षटकांत सर्वबाद 118 (रोहित 8, धवन 2, कोहली 0, पांडे 6, केदार 27 -27 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, धोनी 13, हार्दिक पंड्या 25 -23 चेंडू, 1 षटकार, बेहरेंडॉफ 4-21, झंपा 2-19), पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ः 15.3 षटकांत 2 बाद 122 (हेन्रिकेस नाबाद 62 -46 चेंडू, 4 चौकार, 4 षटकार, ट्रॅव्हिस हेड नाबाद 48 -34 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, भुवनेश्‍वर 1-9) 

Web Title: India cricket australia