भारताची अंतिम फेरीत धडक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

आशियाई चॅम्पियन्स महिला करंडक हॉकीत सलग तिसरा विजय

मुंबई - गतविजेत्या भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेतील धडाका कायम राखताना सलग तिसरा विजय मिळविला. भारताने गुरुवारी मलेशियाचा कडवा प्रतिकार मोडून काढत अंतिम फेरीत धडक मारली. 

कोरियातील दॉंगही सिटीमधील सनराईज स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने जपानला 4-1 आणि चीनला 3-1 असे हरवले होते. त्यापाठोपाठ आता मलेशियाचा 3-2 असा पराभव केला. गुरजीत कौर, वंदना कटारिया आणि लालरेमसियामी यांनी चाळिसाव्या मिनिटास भारतास 3-1 आघाडीवर नेले होते; पण अखेरच्या सत्रात मलेशियाने जोरदार प्रतिहल्ले करीत भारतावर दडपण आणत एक गोलही केला, मात्र अखेर भारताने 3-2 असा विजय मिळविला. 

या स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने मलेशियास 6-0 असे हरवले होते; पण पहिल्या सत्रात भारतास गोलपासून रोखत मलेशियाने भारतास आपली ताकद दाखवून दिली. दुसऱ्या सत्राच्या सुरवातीस मिळालेल्य पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजितने मलेशियाचा बचाव भेदला. त्यानंतर मलेशियाची गोलरक्षिका भारतीय आक्रमकांची डोकेदुखी ठरली. एकतर्फी वर्चस्वानंतरही गोल झाले नाहीत. 

दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर भारतीयांनी आक्रमणात वैविध्य आणले. तिसरे सत्र जास्तच आक्रमक झाले. त्यात सात मिनिटांत एकंदर तीन गोल झाले. भारताची आघाडी वंदनाने हुशारीने वाढवली; पण तीनच मिनिटांत भारताने मलेशियास पेनल्टी स्ट्रोक दिला. भारताची आघाडी 2-1 अशी निसटती केल्याचे मलेशियाचे समाधान फार वेळ टिकले नाही. तीन पेनल्टी कॉर्नर अपयशी ठरल्याची निराशा सुनीता लाक्राच्या पासवर नवोदित लालरेमसियामी हिने गोल करीत दूर केली. त्यानंतर जास्तच आक्रमक झालेल्या मलेशियास भारताची आघाडी कमी केल्याचेच समाधान लाभले. 

आम्ही गोल करण्याच्या संधीचा जास्त फायदा घ्यायला हवा. विजयाचे समाधान आहे; पण खेळावर निराश आहोत. चुकांचा सखोल अभ्यास आता कोणतीही विश्रांती न घेता करणार आहोत. 
- सुनीता लाक्रा, भारतीय कर्णधार 

 

Web Title: india in final