ऑस्ट्रेलियात जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी - सचिन

ऑस्ट्रेलियात जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी - सचिन

नवी मुंबई - भारतीय संघाची सध्याची ताकद बघता विराटच्या सहकाऱ्यांना ऑस्ट्रेलियात जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असे मला खरंच वाटते. आपली वेगवान गोलंदाजांची फळी सध्याच्या घडीला सर्वोत्तम आहे. विराट कोहली भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत आहे. ही संधी साधायलाच हवी, सचिन तेंडुलकरने भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल बोलताना सांगितले. 

तेंडुलकर मिडलसेक्‍स ग्लोबल ॲकॅडमीच्या पहिल्या कॅंपकरिता सचिन तेंडुलकर नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आला होता. जवळपास १५० लहान मुले सकाळच्या सत्रातील कॅंपकरिता आली असताना थेट सचिन तेंडुलकरकडून त्यांना क्रिकेटचे धडे गिरवायला मिळाले. 

मला कल्पना आहे, की भारतात क्रिकेट प्रशिक्षणाचे चांगले तंत्र आहे. तेंडुलकर मिडलसेक्‍स ग्लोबल ॲकॅडमीच्या कॅंपमधे आम्ही फक्त चांगले खेळाडू तयार करायचा विचार न करता चांगले नागरिक घडवायचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, असे खेळाडू जे यश अपयश पचवून पुढच्या प्रगतीचा मार्ग आखतील. असे नागरिक जे दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिकतील. आचरेकर सरांचा आशीर्वाद घेऊन मी हा उपक्रम भारतात राबवत आहे. सरांनी आम्हाला नुसते क्रिकेट नाही, तर संस्कृती शिकवली ज्याचा फायदा कायम होतो आहे, सचिनने सांगितले.

विराट कोहली एकामागोमाग एक विक्रम मागे टाकत चालला आहे आणि त्याची तुलना सचिन तेंडुलकरबरोबर व्हायला लागली आहे त्या बद्दल बोलताना सचिन  म्हणाला, ‘‘मला तुलना अजिबात आवडत नाही. प्रत्येक जमान्यातील क्रिकेटची आव्हाने भिन्न असतात. सीमारेषेपासून ते विकेटपर्यंत आणि गोलंदाजांपासून ते बदलत्या माऱ्यापर्यंत तंत्र बदलत जाते. याच कारणाने मला तुलना पसंत नाही. मी इतकेच म्हणेन की विराटमधली गुणवत्ता फारच स्पष्ट दिसत होती. तो भारताचा नव्हे तर जगातील सर्वोत्तम खेळाडू बनू शकतो, याचा अंदाज मला होता. विराटने त्याच्या क्रिकेट गुणवत्तेला मेहनतीची व तंदुरुस्तीचा जोड दिली आहे. त्याचे क्रिकेट प्रेम आणि एकाग्रता कमाल आहे. म्हणूनच तो यशाची वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करत चालला आहे.’’ 

भारतीय महिला संघ टी-२० वर्ल्डकप खेळायला वेस्ट इंडीजला गेला आहे, त्याबद्दल आशा व्यक्त करताना सचिन म्हणाला, ‘‘आपल्या संघात ताकद गुणवत्ता दोन्ही आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. मला आशा आहे, की टी २० वर्ल्डकपमधे आपला संघ मस्त कामगिरी करेल. भारतीय महिलांच्यात क्रिकेटचे प्रेम वाढत आहे. गावागावांतील लहान मुली क्रिकेट खेळायला मैदानात धाव घेत आहेत.’’ तेंडुलकर मिडलसेक्‍स ग्लोबल ॲकॅडमीत आम्ही मुलींना क्रिकेट शिकवायला उत्सुक आहोत, असे सचिन म्हणाला.

दोन कॅंप मुंबईत करून तिसऱ्या कॅंपकरता सचिन तेंडुलकर मिडलसेक्‍स ग्लोबल ॲकॅडमीला पुण्यात घेऊन येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com