कबड्डीच्या भारतीय साम्राज्याला धक्का 

File photo
File photo

जाकार्ता : आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या मक्तेदारीचा फुगा फुटला. साखळीत कोरियाविरुद्धच्या पराभवाने त्याला तडा गेला आणि उपांत्य फेरीतील इराणविरुद्धच्या पराभवाने तो फुटला. इराणने उपांत्य फेरीच्या लढतीत भारताचा 27-18 असा पराभव केला. 

आशियाई स्पर्धेत कबड्डीचा 1990 मध्ये समावेश झाल्यापासून सलग सात सुवर्णपदके भारतीय संघाने पटकावली होती. मात्र, आठव्या सुवर्णपदकाची लढतही भारतीय संघ खेळू शकला नाही. इराणची गाठ आता कोरियाशी पडेल. त्यांनी पाकिस्तानचा 27-24 असा पराभव केला. 

अबोझर मेघनानी आणि फझल अत्राचली या तगड्या कोपरारक्षकांकडून भारताचा एकही चढाईपटू सुटू शकला नाही. अजय ठाकूर, राहुल चौधरी, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रिशांक देवाडिगा, दीपक हुडा असे एकापेक्षा एक सरस चढाईपटू आज आपला लौकिक राखू शकले नाही. सामन्याच्या पूर्वार्धात एकदाच मिळविलेली 11-10 अशी एकच गुणाची आघाडी हीच काय ती भारतीय संघाला समाधान देणारी बाब ठरली. 

भारतीय संघाने इन्चॉनमध्ये गेल्या आशियाई स्पर्धेत इराणवर अवघ्या एका गुणाने विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले होते. या पराभवाची इराणने आज परतफेड केली.

अखेरच्या दहा मिनिटांत सुरवातीला इराण चार गुणांनी आघाडीवर होते. भारताने ती आघाडी तीन गुणांपर्यंत कमी केली. मात्र, यापुढे त्यांना मजल मारता आली नाही. अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल हे हुकमी चढाईपटू कसे बाहेर राहतील याची काळजी इराणने अचूक घेतली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद करत अंतिम फेरी गाठली. 

महिला तिसऱ्यांदा अंतिम फेरीत 
भारतीय महिला संघाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठून भारताचे किमान रौप्यपदक निश्‍चित केले. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांची गाठ उद्या इराणशीच होणार असून, त्यांच्यावर आता पुरुषांच्या पराभवाचे दडपण राहणार आहे. उपांत्य फेरीत त्यांनी तैवानचे आव्हान 27-14 असे मोडून काढले असले, तरी तैवानच्या मुलींनी त्यांना केलेला प्रतिकार विसरता येणार नाही. महिलांनी 6-0 अशा आघाडीनंतर केलेला विस्कळीत खेळ चिंता करणारा ठरला.

दुसऱ्या उपांत्य लढतीत इराणने थायलंडचा 23-16 असा पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com