हॉकीतील सुवर्ण अपेक्षांना  पुन्हा मलेशियाचा हादरा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सुमारे एका महिन्यापूर्वी मलेशियाच्या वरिष्ठ हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. आता युवा ऑलिंपिकच्या हॉकी फाइव्हमध्येही भारतीय युवकांना सुवर्ण लक्ष्यापासून मलेशियाविरुद्धच्या पराभवाने दुरावले.

मुंबई : सुमारे एका महिन्यापूर्वी मलेशियाच्या वरिष्ठ हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. आता युवा ऑलिंपिकच्या हॉकी फाइव्हमध्येही भारतीय युवकांना सुवर्ण लक्ष्यापासून मलेशियाविरुद्धच्या पराभवाने दुरावले.
 
अर्जेंटिनात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतास हॉकीच्या अंतिम सामन्यात दुहेरी अपयशास सामोरे जावे लागले. मुलींचा संघ यजमान अर्जेंटिनाविरुद्ध 1-3 असा पराजित झाला. त्यापूर्वी मुलांच्या संघाने निर्णायक लढतीत मलेशियाविरुद्ध 2-4 अशी हार पत्करली होती. त्यामुळे भारताच्या दोन्ही संघांना रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. भारताचे दोन्ही संघ सामन्यातील पहिला गोल केल्यानंतर पराजित झाले. 
मुलांच्या अंतिम लढतीत कर्णधार विवेक सागर प्रसादने दुसऱ्या मिनिटास भारताचे खाते उघडले. मात्र दोन मिनिटांत मलेशियाने बरोबरी साधली, मात्र पाचव्या मिनिटास प्रसादनेच भारताचा गोल केला आणि हीच 2-1 आघाडी भारताने विश्रांतीपर्यंत कायम ठेवली. उत्तरार्धात चित्र बदलले. मलेशिया जास्त आक्रमक झाले. त्यांनी चार मिनिटांत दोन गोल करून आघाडी घेतली. त्या वेळीही चार मिनिटे शिल्लक होती. दोन मिनिटे असताना मलेशियाने गोल करीत विजय निश्‍चित केला. 

मुलींची लढत सुरू झाली, त्या वेळी यजमानांचे चाहते जोषात होते. मात्र मुमताज खानने 40 व्या सेकंदास गोल करीत त्यांना हादरवले. मात्र काही वेळातच या स्पर्धेत एकही लढत न गमावलेले अर्जेंटिना स्थिरावले. त्यांनी विश्रांतीस आघाडी घेतली. उत्तरार्धात भारताचा प्रतिकार मोडून काढताना अर्जेंटिनाने एक गोल करीत सुवर्णपदक निश्‍चित केले.  

Web Title: India lost gold medal in hockey in youth olympics