सात्त्विकच्या दुखापतीचा भारताला मोठा फटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आशियाई बॅडमिंटन सांघिक स्पर्धेत भारताला ‘ब’ गटात नवोदित मलेशिया संघाकडून १-४ अशी हार स्वीकारावी लागली.

मनिला (फिलिपिन्स) - आशियाई बॅडमिंटन सांघिक स्पर्धेत भारताला ‘ब’ गटात नवोदित मलेशिया संघाकडून १-४ अशी हार स्वीकारावी लागली. दुहेरीतील हुकमी खेळाडू सात्त्विक रंकीरेड्डी याची अनुपस्थिती भारताला महागडी ठरली.

गुडघा दुखावल्यामुळे सात्त्विकला स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली त्यामुळे भारताला एमआर अर्जुन आणि चिराग शेट्टी व ध्रुव कपिला आणि लक्ष सेन अशा जोड्या खेळवाव्या लागल्या. या दोन्ही जोड्यांचा पराभव झाला. भारताचा एकमेव विजय किदांबी श्रीकांतने मिळवला. एकेरीच्या इतर सामन्यांत बी साईप्रणीत आणि एचएस प्रणोय यांनीही पराभवाची चव चाखली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या पराभवामुळे भारत गटात दुसऱ्या स्थानी आला. आता शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारत थायलंडविरुद्ध खेळेल.

दुबळ्या कझाकिस्तानविरुद्ध सलामीला ४-१ असा विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्‍वास उंचावलेला होता. पण जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारा प्रणित १४ व्या मानांकित ली जी जिआकडून १८-२१, १५-२१ असे पराभूत झाला. 

- 'बिझी' सौरव दादा सचिनला म्हणाला, 'तू नशीबवान आहेस मित्रा!'

चिराग आणि अर्जुन यांचे आव्हान केवळ ३१ मिनिटांत संपले. जागतिक क्रमवारीत ८ व्या स्थानी असलेल्या मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यिक यांनी चिराग-अर्जुनचा २१-१८, २१-१५ असा पराभव केला. त्यानंतर श्रीकांतने चिआम जून वेईवर १४-२१, २१-१६, २१-१९ असा विजय मिळवला.

भारतीय संघ १-२ असे पिछाडीवर असताना ध्रुव आणि लक्षसेन या नव्या जोडीला जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानी असलेल्या ओंग येव सिन आणि तिओ येई यी यांच्याकडून १४-२१, १४-२१ अशी अवघ्या २७ मिनिटांत हार स्वीकारावी लागली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india lost to malaysia by 1-4 in badminton