World Cup 2019 : भक्कम भारतासमोर आफ्रिकेचे किरकोळ आव्हान; विजयासाठी हव्या 228 धावा!

बुधवार, 5 जून 2019

ढगाळ हवामान आणि थोड्या मदत करणार्‍या खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन संघाला 9 बाद  227 असे रोखले. 2019 विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळताना भारतीय गोलंदाजांनी फलंदाजांना जणू जखडून ठेवले.

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्पटन : ढगाळ हवामान आणि थोड्या मदत करणार्‍या खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन संघाला 9 बाद  227 असे रोखले. 2019 विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळताना भारतीय गोलंदाजांनी फलंदाजांना जणू जखडून ठेवले. सातत्याने फलंदाजांना बाद करण्यात यश आल्याने दक्षिण आफ्रिकन धावफलकाला आकार मिळाला नाही. युझवेंद्र चहलने चार फलंदाजांना बाद करून छाप पाडली.   

दोन प्रमुख गोलंदाजांना दुखापत झाल्याने फाफ डु प्लेसीसने नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजीचा पर्याय निवडला. काहीशा ढगाळ वातावरणात सामना चालू झाला. चेंडू स्वींग होण्याची शक्यता लक्षात घेऊन विराट कोहलीने मोहंमद शमी ऐवजी भुवनेश्वर कुमारला संघात जागा दिली. दक्षिण आफ्रिकन संघात डेव्हिड मिलर आणि ड्युमिनी सोबत अष्टपैलू खेळाडूंना जागा दिली गेली. 

जसप्रीत बुमराने आपल्या दुसर्‍याच षटकात अनुभवी हशीम आमलाला बाद केले. टप्पा पडून बाहेर जाणार्‍या चेंडूवर आमलाचा उडालेला झेल रोहित शर्माने बरोबर पकडला. पाठोपाठ बुमराने धोकादायक क्वींटन डिकॉकला बाद केले. डिकॉकने जोरदार आडव्या बॅटचा फटका मारायचा केलेला प्रयत्न चुकला. वेगाने उडालेला झेल कोहलीने पकडला. कप्तान फाफ डु प्लेसीसला त्यानंतर अनेकवेळा भसकन उडालेल्या चेंडूने त्रास दिला. डु प्लेसीसने संयम राखत किल्ला लढवला. मोठे फटके मारायचा मोह डु प्लेसीस आणि डुसेनने टाळला. पहिल्या 10 षटकात फक्त 34 धावा दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना जमा  करता आल्या. डुसेन- डु प्लेसीसने कष्टाने अर्धशतकी भागीदारी रचली. 

धावगतीला वेग मिळत नसल्याचे दडपण डुसेनला झेपले नाही. युझवेंद्र चहलला रिव्हर्स स्वीप मारताना डुसेन चक्क पायामागून बोल्ड झाला. चहलने त्यावर समाधान मानले नाही. पुढच्या षटकात चहलने जम बसलेल्या फाफ डु प्लेसीसला गुगली टाकून बोल्ड केले. समोरून कुलदीप यादवने ड्युमिनीला पायचित केले म्हणल्यावर फलंदाजांवरचे दडपण खूप वाढले. त्याचाच फायदा घेत कोहलीने 5व्या गोलंदाजाची षटके हार्दिक पंड्या आणि केदार जाधव कडून टाकून घेतली.

डेव्हिड मिलर आणि पेहलुक्वायोने जबाबदारी ओळखून फलंदाजी केली. दोघे फलंदाज हवेतून फटके मारणे टाळत होते. भागीदारी तोडायला कोहलीने चहलला परत गोलंदाजीला बोलावले. चहलने लगेच 31 धावांवर खेळणार्‍या मिलरला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल बाद केले. पेहलुक्वायोचा संयम चहलने भंग केला आणि धोनीने त्याला 34 धावांवर स्टंप केले. चहलने आपल्या 10 षटकात 4 फलंदाजांना बाद करून कमाल कामगिरी केली.

 

तळात ख्रिस मॉरीस (42 धावा) आणि रबाडाने मोलाची 66 धावांची भागीदारी रचल्याने डाव लवकर आटोपला नाही. नव्या चेंडूवर चांगली फलंदाजी केल्यास विजयाकरता 228 धावांचे लक्ष भारतीय फलंदाजीकरता अशक्य नक्कीच वाटत नाहीये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India needs 228 runs to win against SA in World Cup 2019