मुंबई कसोटीच्या तयारीत पावसाचं विघ्न

दोन्ही संघांचे बुधवारचे सराव सत्र रद्द; खेळपट्टीवरही परिणाम होण्याची शक्यता
मुंबई कसोटीच्या तयारीत पावसाचं विघ्न
मुंबई कसोटीच्या तयारीत पावसाचं विघ्नsakal media

मुंबई : भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये येत्या ३ डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होत आहे, पण त्याआधी मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे या कसोटीवर विघ्न आले आहे. दोन्ही संघांचे बुधवारचे सराव सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले. आता या पावसाचा परिणाम खेळपट्टीसह कसोटीवरही पडल्यास आश्‍चर्य वाटायला नको. सततच्या पावसामुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठीही पोषक ठरू शकते. यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीत उभय संघांसमोर संघनिवडीचा प्रश्‍न उभा ठाकणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यामधील पहिला कसोटी सामना कानपूर येथे २५ ते २९ नोव्हेंबर यादरम्यान खेळवण्यात आला. त्यानंतर दोन्ही संघ मंगळवारी (३० नोव्हेंबर) मुंबईत दाखल झाले. दोन्ही संघांतील खेळाडू बुधवारी मुंबईत सराव करणार होते, पण मुंबईत बुधवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. याचा फटका दोन्ही संघांतील खेळाडूंच्या सरावाला बसला. अखेर बीसीसीआयने सराव सत्र रद्द झाल्याचे जाहीर केले.

पाऊस जाणार, कसोटी होणार

बुधवारी पडलेल्या पावसाचा परिणाम मुंबई कसोटीवरही होणार अशी शक्यता निर्माण झाली. या वेळी प्रादेशिक हवामान विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सांगण्यात आले, की मुंबईत बुधवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार हे आम्ही सांगितले, पण शुक्रवारपासून परिस्थिती सुधारणार आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या या माहितीनुसार मुंबईतील कसोटी विनाअडथळा पार पडेल, असे या वेळी म्हणता येणार आहे.

गोलंदाजी विभागात बदल?

मुंबई कसोटीपूर्वी पाऊस पडलाय. याचे परिणाम खेळपट्टीवर दिसून येतील. त्यामुळे आता भारतीय तसेच न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजी विभागातही बदल होऊ शकतील. इशांत शर्माला पहिल्या कसोटीत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या कसोटीसाठी त्याला बाहेर बसवण्यात येणार हे जवळपास निश्‍चित आहे. कसोटी सुरू होण्यापूर्वीच्या पावसामुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक ठरू शकते. त्यामुळे उमेश यादवसह मोहम्मद सिराज याला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन वेगवान गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यास प्रसिध कृष्णाचेही कसोटी पदार्पण होऊ शकते, पण अशा परिस्थितीत रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांपैकी कोणाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, असा प्रश्‍नही या वेळी निर्माण होणार आहे.

विराटचे कमबॅक होणार

कर्णधार विराट कोहलीचे या कसोटीत कमबॅक होणार आहे, पण त्याचे संघात पुनरागमन होताना कोणत्या खेळाडूला बाहेर बसवण्यात येईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अजिंक्य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा या दोघांनाही सुमार फॉर्ममधून जावे लागले असले, तरी त्यांना आणखी एक संधी दिली जाईल अशी चर्चा रंगू लागली आहे. सलामीवीर मयांक अग्रवालला बाहेर बसवण्यात येऊ शकते. त्याच्याऐवजी चेतेश्‍वर पुजारा किंवा रिद्धीमान साहाला सलामीला पाठवण्यात येऊ शकते. पहिल्या कसोटीतील सामनावीर श्रेयस अय्यरला त्याच्या घरच्या मैदानावर बाहेर बसवण्यात येणार नाही असे क्रिकेटतज्ज्ञांना वाटते. प्रत्यक्षात ३ डिसेंबरलाच भारताचा मुंबई कसोटीसाठीचा संघ निश्‍चित होईल एवढं मात्र नक्की आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com