World Cup 2019 : भारताची विजयाकडे कूच; पाकच्या दांड्या गुल

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

भारताच्या या आव्हानासमोर पाकिस्तानची सुरवात खराब झाली. भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यानंतर सलामीवीर इमाम उल हक याला विजय शंकरने पायचीत बाद केले. त्यानंतर फखर झमानच्या मदतीला आलेल्या बाबर आझमने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत शतकी भागीदारी नोंदविली.

मँचेस्टर : बाबर आझम आणि फखर झमान यांची शतकी भागीदारीने भारतीयांच्या मनात थोडी हुरहूर सुरु असतानाच चायनामन कुलदीप यादवची फिरकी भारताच्या मदतीला आली. त्यानंतर जणू काही सामन्याचे चित्रच बदलले अन् पाकिस्तानचा अर्धा संघ पॅव्हेलियन परतला.

गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा घेतलेला अपेक्षित निर्णय भारतीय फलंदाजांनी त्यांच्यावरच उलटवला. रोहित शर्माचे तडाखेबंद शतक, कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल यांची अर्धशतके या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या. पाकिस्तानचे हुकमी अस्त्र असलेल्या महंमद अमीरने शेवटच्या टप्प्यात टिच्चून मारा करून तीन फलंदाजांना बाद केले म्हणून धावफलकाला थोडातरी आळा बसला. 

भारताच्या या आव्हानासमोर पाकिस्तानची सुरवात खराब झाली. भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यानंतर सलामीवीर इमाम उल हक याला विजय शंकरने पायचीत बाद केले. त्यानंतर फखर झमानच्या मदतीला आलेल्या बाबर आझमने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत शतकी भागीदारी नोंदविली. पाकिस्तान लक्ष्याकडे जात असताना कुलदीपची फिरकी भारताच्या मदतीला आली. त्याने बाबरचा त्रिफळा उडविला. त्यापाठोपाठ फखरचा अडखळाही कुलदीपने हटविला. हार्दीक पंड्याने मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिक यांना एकाच षटकाच बाद करून पाकिस्तानची अवस्था 5 बाद 139 अशी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Pakistan match in World Cup 2019