भारत-पाक मालिकेचा चेंडू ‘बीसीसीआय’च्या कोर्टात

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

कोलकता  - ‘आयसीसी’च्या कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणे अपेक्षित आहे. पण, भारत सरकारच्या परवानगीवर ही मालिका अवलंबून असल्याने या मालिकेबाबत आता चेंडू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कोर्टात असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख नजम सेठी यांनी सांगितले.

कोलकता  - ‘आयसीसी’च्या कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणे अपेक्षित आहे. पण, भारत सरकारच्या परवानगीवर ही मालिका अवलंबून असल्याने या मालिकेबाबत आता चेंडू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कोर्टात असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख नजम सेठी यांनी सांगितले.

‘आयसीसी’च्या दोन दिवसांच्या बैठकीच्या निमित्ताने सेठी येथे आले होते. बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले, ‘‘या दोन शेजारील देशांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे द्विपक्षीय मालिका होत नाही. आयसीसीच्या स्पर्धेत हे देश एकमेकांशी खेळत असले, तरी उपखंडातील चाहत्यांसाठी या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका अपेक्षित आहे. यामध्ये आता सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे. आम्ही तयार आहोत, आता बीसीसीआयनेच निर्णय घ्यायचा आहे.’’

आयसीसीच्या इमर्जिंग आशिया करंडक स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरवात होईल अशी आशाही सेठी यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सेठी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळाडूंच्या गैरवर्तनाबाबत आयसीसीने कडक पावले उचलायला हवीत, असे मतही मांडले. शशांक मनोहर यांना आयसीसी कार्याध्यक्ष म्हणून मुदतवाढ मिळण्याबाबत त्यांनी आडून का होईना; पण मनोहर यांना पाठिंबा असल्याचे संकेत दिले.

नुकसान भरपाईवर ऑक्‍टोबरमध्ये सुनावणी
पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्यास ‘बीसीसीआय’ने विरोध केल्यामुळे पाक क्रिकेट मंडळाने ७ कोटी डॉलरची नुकसान भरपाई मागितली आहे. या दोन देशांच्या क्रिकेट मंडळांत झालेल्या परस्पर सामंजस्य करारानुसार २०१५ ते २०२३ या कालावधीत ६ मालिका होणे अपेक्षित होते. पण, आतापर्यंत एकही मालिका झालेली नाही. त्यामुळे पाक मंडळाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या सुनावणीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असे सेठी यांनी म्हटले आहे.

Web Title: India-Pakistan series in BCCI court