rain
rain

World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामन्याचा निकाल राखीव दिवशी

मॅंचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत पावसानेच अधिक काळ खेळ केला. ढगाळ हवामान आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना डोक्‍यावर बसणारे डकवर्थ लुईस नियमाचे भूत लक्षात घेऊन न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी शिस्त पाळून गोलंदाजी केल्याने न्यूझीलंडला 46.1 षटकांमध्ये 5 बाद 211 धावा काढता आल्या. कर्णधार केन विल्यमसनने 67 आणि रॉस टेलरने नाबाद 67 धावा करून न्यूझीलंडच्या डावाचा भार उचलला. डाव अखेरच्या टप्प्यात असतानाच पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर त्यानेच पूर्ण वेळ खेळ केला. पावसाने विश्रांती घेतल्यावर खेळ सुरू होण्याची शक्‍यता वाढलेली असतानाच पुन्हा पाऊस आला आणि अखेर उपांत्य फेरीचा निकाल उद्यावर ढकलला गेला. 

सामन्याअगोदर अर्धा तास नाणेफेकीकरिता दोन्ही कर्णधार जात असताना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाच्या खेळपट्टीचा अंदाज लागत नव्हता आणि हवामानही ढगाळ होते. कोहली आणि विल्यमसन समोरचा कर्णधार नाणेफेक जिंकू देत हाच विचार करीत असावेत. विल्यमसनने नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी करण्याचा निर्णय एकतर मैदानाचा इतिहास बघून नाही, तर डकवर्थ-लुईस नियमाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन घेतला असावा. भारताने कुलदीप यादवची जागा युजवेंद्र चहलला दिली. 

पहिल्या चेंडूवर पायचीतच्या अपिलामधून वाचलेला न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल बुमराचा बळी ठरला. कोहलीने स्लिपमध्ये त्याचा वेगवान झेल घेतला. त्यानंतर दडपणाखाली सर्वोत्तम फलंदाजी करायचे गुण असलेल्या विल्यमसनने खेळपट्टीवर आल्यापासून खूप परिपक्व फलंदाजी केली. एकेरी धावांवर भर देत विल्यमसनने धावफलक हलता ठेवला. भारताची गोलंदाजी कमालीची अचूक होती. डावाच्या 8व्या षटकात पहिला चौकार मारला गेला आणि 10 षटकांनंतर 27 धावा जमा झाल्या होत्या. यावरून गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याचा अंदाज येईल. 

जडेजा आणि चहलने गोलंदाजी चालू केल्यावर खेळपट्टी फिरकीला साथ देत असल्याचे दिसले. जडेजाने भसकन चेंडू वळवून निकोल्सला बोल्ड केले. चार चौकारांसह 67 धावा केल्यावर विल्यमसनला चहलने बाद केले. चहलच्या थोड्या वळलेल्या चेंडूचा अंदाज चुकल्याने विल्यमसनने जडेजाकडे झेल दिला. निशमला फटकेबाजीकरिता बढती दिली गेली. हार्दिक पंड्याने निशमला बाद करून ती योजनाही यशस्वी होऊ दिली नाही. 

एव्हाना खेळपट्टीवर जम बसविलेल्या अनुभवी रॉस टेलरने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतली. चहलच्या शेवटच्या षटकात 18 धावा चोपून काढत रॉस टेलरने अर्धशतक पूर्ण करण्याबरोबर धावफलकाला थोडी गती दिली. 5 फलंदाज बाद झाल्यावर टॉम लॅथम फलंदाजीला आला. यावरून न्यूझीलंड संघातील फलंदाजीची खोली लक्षात येईल. न्यूझीलंडच्या डावातील 3.5 षटकांचा खेळ बाकी राहिला असताना पावसाने मैदानात हजेरी लावली आणि पंचांनी खेळ थांबविला तेव्हा रॉस टेलर 67 धावा करून खेळत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com