World Cup 2019 : भारतीय गोलंदाजी भन्नाटच; न्यूझीलंडला रोखण्यात यश

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah

मँचेस्टर : ढगाळ वातावरणाचा धसका घेत केन विल्यमसनने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शिस्त पाळून गोलंदाजी केल्याने न्युझिलंडला46.1 षटकांमधे 5 बाद 211 धावा काढता आल्या. कर्णधार केन विल्यमसनने 67 आणि रॉस टेलरने नाबाद 67 धावा करून धावसंख्येचा मुख्य भार नेहमीप्रमाणे पेलला. 

सामन्याअगोदर अर्धा तास नाणेफेकीकरता दोनही कप्तान जात असताना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाच्या खेळपट्टीचा अंदाज लागत नव्हता आणि हवामानही ढगाळ होते. कोहली आणि विल्यमसन हाच विचार करत असणार की समोरचा कप्तान नाणेफेक जिंकूदेत. विल्यमसनने नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी करायचा घेतलेला निर्णय मैदानाचा इतिहास तपासून घेतला असेल कदाचित. कुलदीप यादवची जागा युझवेंद्र चहलला देण्यात आली तोच एक बदल भारतीय संघात झाला.

भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर गुप्टील विरुद्ध पायचीतची दाद मागितली गेली. पंचांनी नकारार्थी मान हलवली आणि रोहित शर्माने चेंडू डाव्या यष्टी बाहेर जात होता असे सांगूनही विराट कोहलीने आततायीपणाने तिसर्‍या पंचांकडे दाद मागितली आणि भारताचा एकमेव रिव्ह्यू वाया गेला. गुप्टीलला बुमराने लगेच बाद केले जेव्हा कोहलीने वेगाने उडालेला झेल बरोबर पकडला. 

सगळ्यांच्या नजरा केन विल्यमसनवर खिळल्या. दडपणाखाली सर्वोत्तम फलंदाजी करायचे गुण असलेल्या विल्यमसनने खेळपट्टीवर आल्यापासून खूप परिपक्व फलंदाजी केली. एकेरी धावांवर भर देत विल्यमसनने धावफलक हलता ठेवला. समोर खेळणारा निकोल्स खूप चाचपडत फलंदाजी करत होता. 8व्या षटकात पहिला चौकार मारला गेला आणि 10 षटकांनंतर 27 धावा जमा झाल्या होत्या या वरून गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्‍याचा अंदाज येईल.

जडेजा आणि चहलने गोलंदाजी चालू केल्यावर खेळपट्टी फिरकीला साथ देत असल्याचे दिसले. जडेजाने भसकन चेंडू वळवून निकोल्सला बोल्ड केले. चार चौकारांसह 67 धावा केल्यावर विल्यमसनला बाद करता आले. चहलच्या थोड्या वळलेल्या चेंडूचा अंदाज चुकल्याने विल्यमसनने जडेजाकडे झेल दिला. निशमला फटकेबाजीकरता बढती दिली गेली. हार्दिक पंड्याने निशमला बाद करून ती योजनाही यशस्वी होऊन दिली नाही. 

एव्हाना खेळपट्टीवर जम बसवलेल्या अनुभवी रॉस टेलरने खेळाची सूत्र आपल्या हाती घेतली. चहलच्या शेवटच्या षटकात 18 धावा चोपून काढत रॉस टेलरने अर्धशतक पूर्ण करण्याबरोबर धावफलकाला थोडी गती दिली. 5 फलंदाज बाद झाल्यावर टॉम लॅथम फलंदाजीला आला या वरून न्युझिलंड संघातील फलंदाजीची खोली लक्षात येईल. 3.5  षटकांचा खेळ बाकी राहिला असताना भुरभुर पावसाने मैदानात हजेरी लावली आणि पंचांनी खेळ थांबवला तेव्हा रॉस टेलर 67 धावा करून खेळत होता. 

गुगली पडला
सगळ्यांचा अंदाज होता की भारतीय संघ दुसर्‍या क्रमांकाने उपांत्य फेरीत दाखल होईल आणि सामना बर्मिंगहॅमला असेल. बहुतेक भारतीय चाहत्यांनी त्याचाच विचार करताना बर्मिंगहॅम सामन्याची तिकिटे काढून ठेवली आणि प्रवासाचे बेत पक्के केले. अचानक दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून धमाल उडवली. भारत अव्वल स्थानी विराजमान झाल्याने उपांत्य सामना मँचेस्टरला झाला. त्याने झाले काय की मँचेस्टर सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली नव्हती. सामन्याच्या आदल्या दिवशी काळा बाजार करणार्‍यांनी तिकिटाचे दर अवाच्या सवा वाढवले. कामाचा दिवस आणि अगोदर योजना आखलेली नसल्याने तिकिटांना मागणी अपेक्षेइतकी नव्हती. परिणामी अगदी सामन्याच्या सकाळपर्यंत तिकिटे आणि ती सुद्धा वाजवी दरात उपलब्ध होती.

संक्षिप्त धावफलक ः 
न्यूझीलंड ः 46.1 षटकांत 5 बाद 211 (मार्टिन गप्टील 1, हेन्री निकोल्स 28-51 चेंडू, 2 चौकार, केन विल्यमसन 67-95 चेंडू, 6 चौकार, रॉस टेलर खेळत आहे 67-85 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, जिमी निशॅम 12-18 चेंडू, 1 चौकार, कॉलिन डी ग्रॅंडहोम 16-10 चेंडू, 2 चौकार, टॉम लॅथम खेळत आहे 3, भुवनेश्वर कुमार 8.1-1-30-1, जसप्रीत बुमरा 8-1-25-1, हार्दिक पंड्या 10-0-55-1, रवींद्र जडेजा 10-0-34-1, युजवेंद्र चहल 10-0-63-1) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com