INDvsSA : पावसामुळे दिवसाचा खेळ थांबला; भारताच्या नाबाद 202 धावा

India scores 202 runs against South Africa in 1st test
India scores 202 runs against South Africa in 1st test

विशाखापट्टणम : कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी चहापानापर्यतच्या चार तासांच्या खेळात बिनबाद 202 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली. चहापानाच्या ठोक्यालाच मैदानावर पाऊस कोसळू लागला आणि थांबलेला खेळ परत चालू झाला नाही. रोहित शर्मा 115 धावांवर तर मयांक आगरवाल 84 धावांवर खेळत होते.

नाणेफेकीचा कौल विराट कोहलीच्या बाजूने लागल्यावरच फाफ डु प्लेसिसच्या कपाळावर आठ्यांचे जाळे दिसले. कोहलीने अर्थातच प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. एका बाजूने रबाडा आणि दुसर्‍या बाजूने फिलेंडर असा मारा चालू करून दक्षिण आफ्रिकेने ताज्या खेळपट्टीचा फायदा घ्यायचा माफक प्रयत्न केला. मयांक आगरवाल आणि रोहित शर्मा जोडीने नवा चेंडू आरामात खेळून काढल्यावर 9व्या षटकातच डु प्लेसिसने केशव महाराजची फिरकी गोलंदाजी चालू केली.

एव्हाना जम बसलेल्या रोहित शर्माने मग बेधडक फटकेबाजी केली. फिरकी गोलंदाजांना पुढे सरसावत रोहितने उत्तुंग षटकार मारत अर्धशतक साजरे केले. समोरून मयांक आगरवालने भक्कम फलंदाजी करून गोलंदाजांना यशापासून लांब ठेवले. उपहाराला जोडी बिनबाद 91 धावा करून परतली.

हाती असलेल्या पाच गोलंदाजांना गोलंदाजी करायची संधी फाफ डु प्लेसिसने दिली. दोनही भारतीय फलंदाजांनी चांगल्या चेंडूंना मान दिला तर खराब चेंडूंवर चौकार - षटकार मारले. मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळतो तशी फलंदाज रोहित शर्माने केली. क्षेत्ररक्षक सीमेवर उभा केला असतानाही रोहित हवेतून फटके मारताना दचकला नाही. 5 षटकार मारताना त्याने फिरकी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

उपहारानंतर दोघा फलंदाजांनी आक्रमणाची धार तेज केली. अवघ्या 154 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह रोहित शर्माने शतक पूर्ण केले आणि सगळा भारतीय संघ उभे राहून टाळ्या वाजवू लागला. मयांक आगरवालही जास्त मागे नव्हता. त्यानेही सहज सुंदर फलंदाजी करत 11 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 84 धावा जोडल्या. भागीदारीने द्विशतक पूर्ण केल्यावर पावसाने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना दिलासा दिला.

59 षटकांच्या खेळात भारतीय संघाने बिनबाद 202 धावांची मजल मारून पहिल्या दिवशीच्या खेळावर मोहोर उमटवली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com