तिसऱ्या सलामीवीराचा प्रश्न कायमच

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यासमोर काही प्रश्‍न "आ' वासून उभे आहेत. यातही दौऱ्यासाठी तिसऱ्या सलामीचा फलंदाज आणि दुसऱ्या यष्टिरक्षकाची निवड हे दोन प्रमुख प्रश्‍न असतील. a

हैदराबाद : वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यासमोर काही प्रश्‍न "आ' वासून उभे आहेत. यातही दौऱ्यासाठी तिसऱ्या सलामीचा फलंदाज आणि दुसऱ्या यष्टिरक्षकाची निवड हे दोन प्रमुख प्रश्‍न असतील. 

विंडीजविरुद्धच्या मालिकेतून पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी आपली जागा निश्‍चित केली आहे. राहुल सातत्याने अपयशी होत असतानाही व्यवस्थापन त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कोहली म्हणाला, ""राहुल त्याच्या चुकांकडे गांभीर्याने पाहिल आणि त्या दुरुस्त करेल याची मला खात्री आहे. तो कमालीचा सकारात्मक विचार करणारा खेळाडू आहे. त्याला सल्ला देणाऱ्यांचाही तो मान राखतो आणि आपल्या चुका समजून घेतो.'' 

राहुलला थेट कर्णधाराचे पाठबळ मिळाले असले, तरी तो यानंतरही अपयशी ठरला तर तिसरा सलामीचा फलंदाज कोण हा प्रश्‍न उरतोच. याबाबत संघ व्यवस्थापन आणि निवड समितीसमोर सध्या तरी पर्याय उपलब्ध नाही. यष्टिरक्षणाच्या बाबतीतही असेच काहीसे घडणार आहे. रिषभ पंतने सध्या तरी संधी साधली असे म्हणता येत असले, तरी त्याच्या यष्टिरक्षक म्हणून क्षमतेस अजूनही तो न्याय देऊ शकलेला नाही, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. वृद्धिमान साहा तंदुरुस्त झाल्यास तो पर्याय त्यांच्यासमोर असेल. 

असे असतील पर्याय सलामीसाठी 
मयांक अगरवाल : देशांतर्गत स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी, भारतीय संघाकडून संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत, सर्वोत्तम खेळाची क्षमता पण, अनुभवात कमी 
मुरली विजय : सध्या भारतातील सर्वोत्तम तंत्र असलेला फलंदाज 
शिखर धवन : एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशस्वी मात्र, कसोटी क्रिकेट खेळताना सातत्याचा अभाव 
करुण नायर : संधीच्या प्रतीक्षेत. मधल्या फळीत यशस्वी. सलामीला खेळण्याची क्षमता 

प्रश्‍न सोडविण्यासाठी 
मयांक आणि मुरली यांनी न्यूझीलंड अ विरुद्धच्या मालिकेत सलामीला खेळवावे आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूस संधी द्यावी. 

यष्टिरक्षणासाठी 
वृद्धिमान साहा : अंगठ्याच्या दुखापतीनंतर निवडीसाठी उपलब्ध असण्याची शक्‍यता. यष्टिरक्षक म्हणून गुणवत्ता सिद्ध. मात्र, प्रशिक्षकांच्या मते सध्या फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूचा विचार शक्‍य 
कोना भारत : सहा महिने "अ' संघाकडून कामगिरी, अलीकडेच ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी 
पार्थिव पटेल : वेगवान गोलंदाजांसमोर आडव्या बॅटने खेळू शकतो. त्याचवेळी सलामीला खेळण्याच्या अनुभवाचा फायदा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India still in search of third opener