महिला हॉकीत भारताची स्पेनशी बरोबरी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

अनुपा बार्ला हिने अखेरच्या सत्रात केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय महिलांना स्पेनविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 1-1 अशी बरोबरी राखता आली. पाच सामन्यांच्या मालिकेतही आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 
 

माद्रिद - अनुपा बार्ला हिने अखेरच्या सत्रात केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय महिलांना स्पेनविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 1-1 अशी बरोबरी राखता आली. पाच सामन्यांच्या मालिकेतही आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 

पहिल्या सामन्यात भारतीय महिलांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यातही त्यांच्या खेळात चढउतार होते. मात्र, अखेरच्या सत्रात भारतीय महिलांनी आपला खेळ कमालीचा उंचावला. याचा फायदा घेत सामन्याच्या 54व्या मिनिटाला अनुपा हिने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. त्यापूर्वी सामन्याच्या पूर्वार्धात 14व्या मिनिटाला बेर्टा बोनास्ट्रे हिने स्पेनचे खाते उघडले होते. 

पहिल्या सत्रात दोन्ही संघातील खेळाडूंनी चेंडूवर ताबा मिळविण्याचे तंत्र राखत मैदानाच्या मध्यातच खेळ केला. काही संधी देखील दोन्ही संघांकडून निर्माण करण्यात आल्या. मात्र, यात पूर्वार्धात स्पेनला यश आले. त्यानंतर भारतीय महिलांनी काही चांगल्या चाली रचल्या. पण, भारतीय आक्रमक स्पेनची गोलरक्षक मारिया रुईझला चकवू शकल्या नाहीत. उत्तरार्धात भारतीय महिलांचा खेळ कमालीचा उंचावला. त्यांची आक्रमण धारदार होत होती. त्यामुळे दडपणाखाली आलेल्या स्पेनला भारतीयांना रोखणे कठीण गेले. याचा फायदा उठवत अनुपाने भारतीयांना बरोबरी साधून दिली. 

Web Title: India tie in women's hockey match