भारतीय खेळाडूंत लढाऊ वृत्तीचा अभाव : गावसकर

यूएनआय
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे : भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाबद्दल भारतीय संघावर सडकून टीका केली आहे. 'आजपर्यंतचा हा सर्वांत मानहानिकारक पराभव असून, त्यांच्यात लढाऊवृत्तीचा अभाव होता,' असे त्यांनी म्हटले आहे. 

पुणे : भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाबद्दल भारतीय संघावर सडकून टीका केली आहे. 'आजपर्यंतचा हा सर्वांत मानहानिकारक पराभव असून, त्यांच्यात लढाऊवृत्तीचा अभाव होता,' असे त्यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण तीन दिवसही खेळू शकला नाही. एका वाहिनीला मुलाखत देताना गावसकर म्हणाले, ''भारतीय संघाची मायदेशात झालेली ही सर्वांत खराब कामगिरी म्हणता येईल. सलग 19 सामन्यांत अपराजित राहिल्यानंतरही भारतीय फलंदाजानी ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीचा सामना केला, ते बघून आश्‍चर्याचा धक्का बसला. हा एक वाईट दिवस असे म्हणता येईल. पण, भारतीय खेळाडूंनी अजिबात लढाऊवृत्ती दाखवली नाही, याचे अधिक आश्‍चर्य वाटते.'' 

खेळपट्टीवर थांबलो की धावा होतात, हे बेसिकच भारतीय फलंदाज विसरल्यासारखे वाटले, असे सांगून गावसकर म्हणाले, ''तिसऱ्या दिवशी चहापानानंतर अवघ्या अर्ध्या तासात भारताचा डाव संपला हे अविश्‍वसनीय होते. भारतीय खेळाडू बेफिकीर वाटले. खेळपट्टीवर थांबायलाच भारतीय फलंदाज विसरला होता.'' 

ऑस्ट्रेलियाचे स्मार्ट क्रिकेट 
सलग विजय मिळविणारा भारत विरुद्ध सलग पराभवाच्या गर्तेत अडकलेला ऑस्ट्रेलिया संघ असा हा सामना होता. घरच्या मैदानावर खेळताना साहजिकच भारताचे पारडे जड राहणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात वेगळेच घडले, असे सांगून गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाने 'स्मार्ट' खेळ केला.

ते म्हणाले, ''स्मिथची खेळी कर्णधाराच्या जबाबदारीला साजेशी अशीच होती. त्याची ही सर्वोत्तम शतकी खेळी ठरावी. लियॉन आणि ओकिफ यांनी भारतीय फलंदाजांच्या डोळ्यांत पाणी आणले.'' ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक करताना गावसकर यांनी त्यांच्या क्षेत्ररक्षणाला देखील दाद दिली. ते म्हणाले, ''पहिल्या कसोटीच्या विजयात क्षेत्ररक्षण हा मुद्दाही कळीचा ठरला. ऑस्ट्रेलियाने प्रत्येक झेल पकडला. पण, भारतीय खेळाडूंनी तब्बल पाच झेल सोडून त्यांना वर्चस्व राखण्यासाठी जणू मदतच केली.''

Web Title: India versus Australia Virat Kohli Team India Sunil Gavaskar