
IND vs AUS Test: 'सर' जडेजासमोर कांगारूंचे लोटांगण! ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 113 धावांवर आटोपला
India vs Australia 2nd Test Day 3 Updates : नागपुरात ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर टीम इंडियाने दिल्ली कसोटीतही आपली पकड मजबूत केली आहे. दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अवघ्या 3 चेंडूत संपूर्ण सामना बदलला. या तीन चेंडूंमध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाचा संघ या धक्क्यातून सावरू शकला नाही आणि दुसऱ्या डावात 113 धावांवर आटोपला. रवींद्र जडेजाने 7 तर आर अश्विनच्या खात्यात 3 विकेट घेतल्याने नागपूरनंतर दिल्लीच्या विजयाचा मार्ग भारतासाठी सोपा झाला. भारताला विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी चांगली सुरुवात केली. दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आर अश्विनने ऑस्ट्रेलियाला घायाळ करायला सुरुवात केली. पहिल्या सत्रातच अश्विन-जडेजा जोडीने तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यानंतर मार्नस लबुशेन देखील बाहेर केले. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड करून 95 धावांवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.
त्यानंतर पुढचे षटक करण्यासाठी रवींद्र जडेजा आला आणि त्याने पीटर हँड्सकॉम्ब आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची सलग 2 चेंडूत शिकार केली. भारताने दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले.आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 113 धावांत गारद झाला. जडेजाने सात आणि अश्विनने तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय फक्त मार्नस लबुशेन (35) दुहेरी आकडा गाठू शकला. आता भारतासमोर विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी सुरेख अर्धशतके झळकावली. भारताकडून शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने खराब सुरुवात करूनही 262 धावा केल्या. अक्षर पटेलने शानदार अर्धशतक झळकावले आणि अश्विनसोबत शतकी भागीदारी केली. विराट कोहलीनेही 44 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने पाच विकेट घेतल्या.