
IND vs AUS 3rd Test : निम्मा संघ असणार नवीन; कांगारूंची भारतीय फिरकीविरूद्ध नवी रणनिती
IND vs AUS 3rd Test Travis Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जवळपास निम्मा संघ हा नवीन असणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळलेल्या अनेक खेळाडूंनी दुखापत आणि इतर वैयक्तिक कारणांमुळे मायदेश गाठला आहे. यामुळे आता तिसऱ्या सामन्यात कांगारूंचा निम्मा संघ नवा असणार आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅविस हेडने भारतीय फिरकीविरूद्ध आक्रमक डावपेच वापरणार असल्याचे संकेत दिले आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन कसोटी सामन्यात अडीच दिवसात गाशा गुंडाळावा लागला होता. यावेळी कांगारूंनी भारतीय फिरकीचा सामना करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले.

हेडला नागपूर कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. याबाबत हेड म्हणाला की, 'या गोष्टीची मला अपेक्षा नव्हती. मी या बाबत खूप चर्चा केली. कोचिंग स्टाफ आणि निवडसमितीचा मी आदर करतो. माझे आणि त्यांचे नाते खूप चांगले आहे. सामन्यानंतर मी स्वतःला सांगितले की मी अजूनही मला जे आवडते ते मी करत आहे. हा फक्त एक आठवडा माझ्या मनासारखा गेलेला नाही.
हेडला दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली. त्याने डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थिती डावाची सुरूवात केली. त्याने भारतीय गोलंदाजांवर दबाव देखील बनवला. त्याने दुसऱ्या दिवशी चांगला किल्ला लढवला. मात्र तिसऱ्या दिवशी तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने 52 धावात नऊ विकेट्स गमावल्या. दिल्ली कसोटीत हेडने दुसऱ्या डावात 43 धावा केल्या. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे हेडने सांगितले.
ऑस्ट्रेलिया भारताविरूद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या 0 - 2 ने पिछाडीवर आहे. हेडने मान्य केले की मालिकेत पुनरागमन करण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. तो म्हणाला की,
'आमचा संघ खूप मजबूत आणि एकजूट आहे. सामन्यादरम्यान अशी परिस्थिती असेल की आम्ही चांगल्या स्थितीत नसू मात्र आम्हाला याचा सामना केला पाहिजे. तुम्हाला हवी तशी परिस्थिती मिळणार नाही. येणारे दोन आठवडे आमच्यासाठी खूप आव्हानात्मनक असणार आहेत. आम्हाला लय पुन्हा कशी प्राप्त करायची हे पहायला हवे.'