
Steve Smith : मी हे काय करतोय... स्टीव्ह स्मीथने सांगितला तो दुर्मिळ किस्सा
Steve Smith IND vs AUS 3rd Test : इंदूर येथे उद्यापासून (दि. 1 मार्च) सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करणार आहे. पहिल्या दोन कसोटीत दारूण पराभव झालेल्या ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या कसोटीत थोडा प्रतिकार अपेक्षित आहे.
स्मिथने दुसऱ्या कसोटीत चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अश्विनने दिल्ली कसोटीत त्याला पायचित पकडले. यानंतर स्टीव्ह स्मिथवर प्रचंड टिका झाली. याबाबत स्मिथने तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले.
स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या कसोटीत तो अश्विनच्या जाळ्यात ज्या प्रमाणे अडकला ते पाहून निराशा झाल्याचे सांगितले. हा त्याच्या कारकिर्दितील एक दुर्मिळ क्षण होता असं तो म्हणाला.
स्मिथ पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, 'मी मैदानात उतरलोय आणि मी हे काय करतोय असं वाटण्याचे खूप कमी प्रसंग आहे. मी दिल्ली कसोटीनंतर खूप रागात होतो. मी माझ्या कारकिर्दित मी हे काय केलं अस म्हणण्याची वेळ खूप कमीवेळा आली आहे. तो माझ्यासाठी खूप चांगला क्षण नव्हता.'
स्टीव्ह पुढे म्हणाला, 'या गोष्टीतून नक्कीच शिकण्याची गरज आहे. मी अजूनही शिकतोय मी अशा प्रकारे खेळू इच्छित नव्हतो. माझ्यासाठी त्यांनी सापळा रचला होता तरी मी तसं खेळलो.'
स्टीव्ह स्मिथने सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत फक्त 71 धावा केल्या आहेत. तो आता ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. पॅट कमिन्सची आई आजारी असल्याने तो मायदेशी परतला असून त्याच्या ऐवजी स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीत जोरदार पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. 33 वर्षाच्या स्मिथने ऑस्ट्रेलियाचे 2014 ते 2018 दरम्यान नेतृत्व केले होते. मात्र सँडपेपर प्रकरणानंतर त्याला एक वर्षाची बंदी आणि कर्णधारपद गमवावे लागले होते.
गेल्या भारतीय दौऱ्यावर स्टीव्ह स्मिथने कसोटीत 499 धावा केल्या होत्या. यात तीन शतकी खेळींचा देखील समावेश होता. मात्र ऑस्ट्रेलियाने 2 - 1 अशी मालिका गमावली होती. मात्र या मालिकेत स्मिथची कामगिरी सुमार झाली आहे. परंतू तो आता कॅप्टन झाल्याने गोष्टी बदलतील असा विश्वास त्याला आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...