WTC Final Ind vs Aus : विजेतेपदाचा दुष्काळ भारतीय संपवणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs australia live streaming wtc final 2023 when and where to watch

WTC Final Ind vs Aus : विजेतेपदाचा दुष्काळ भारतीय संपवणार?

ओव्हल (लंडन) : धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये आयसीसी करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर विविध स्पर्धांत भारतीय संघाने मोठी प्रगती केली, परंतु विजेतेपदाचा अडथळा पार करता आलेला नाही. सलग दुसऱ्यांदा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्याची संधी भारतीयांना मिळाली आहे. आता तरी विजेतेपदाचा करंडक उंचावणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे, परंतु त्यासाठी दडपणाखाली सर्वोत्तम खेळ करण्याचे आव्हान असेल.

इंग्लंडमध्ये कसोटी सामना म्हटल्यावर थंडगार हवा आणि काहीसे वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असेच वातावरण डोळ्यासमोर येते. बुधवारपासून ओव्हल मैदानावर चालू होणारा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठीचे वातावरण असेच असेल.

२००७ मधील विश्वचषक स्पर्धेतील जीवघेण्या अपयशानंतर इंग्लंड दौऱ्यात यश मिळून याच ओव्हल मैदानावर राहुल द्रविडने कसोटी मालिका जिंकल्यावर चषक उंचावला होता. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना चालू होत असताना अशीच सकारात्मक नाट्यमय कलाटणी भारतीय संघाला मिळेल अशी आशा मनात डोकावत आहे.

इंग्लिश वातावरणाचा फायदा ऑस्ट्रेलियन संघाला जास्त होण्याची शक्यता बरेच जाणकार बोलून दाखवत आहेत. फरक इतकाच आहे, की भूतकाळाच्या तुलनेत भारतीय संघाच्या भात्यात दर्जेदार वेगवान गोलंदाज तयार झाले आहेत. मिचेल स्टार्क - पॅट कमिन्सप्रमाणे महंमद शमी - सिराजची जोडी भेदक मारा करायची क्षमता राखून आहे. दोनही संघांच्या फलंदाजांकडे इंग्लंडमध्ये खेळायचा दांडगा अनुभव आहे. यष्टिरक्षक मात्र इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कसोटी सामना खेळणार आहेत.

ओव्हल मैदानाची खेळपट्टी पाहूनच रोहित शर्मा अंतिम ११ जणांच्या खेळाडूंची निवड करणार आहे. भारतीय संघ तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांना जागा देणार, की ४ वेगवान आणि रवींद्र जडेजाला पसंती देणार का हे बघायचे आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणणाऱ्या अश्विनला संघात जागा मिळते का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वेगवान गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजीच्या गुणांमुळे शार्दुल ठाकूरला जागा मिळायची दाट शक्यता वाटत आहे.

एक अतिरिक्त दिवस

सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता चालू होणार आहे. लंडनमध्ये जून महिन्यात पावसाची शक्यता लक्षात ठेवून अतिरिक्त एक दिवस सामन्याचा निकाल लागावा म्हणून राखीव ठेवला आहे.

पहिला डाव महत्त्वाचा

सामन्याचे समालोचन करायला आलेले माजी खेळाडू ओव्हल मैदानावर भेटले असता त्यांनी सगळा खेळ पहिल्या डावात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याचा असल्याचे सांगितले. पहिल्या डावात मागे पडणारा संघ दुसऱ्या डावात पुनरागमन करायच्या घटना विरळा झाल्याचे मत सगळ्यांनी व्यक्त केले. भारतीय संघाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात ८०-९० षटके खेळपट्टीवर तग धरण्याचे आव्हान पेलायला हवे, अशी सगळ्यांची अपेक्षा होती.

रोहित म्हणतो... वातावरणाचा फायदा घेतला पाहिजे

1 कसोटी सामना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत असला, तरी ओव्हल मैदानावर या मोसमातील पहिला सामना नाहीये. भारतीय खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळायचा भरपूर अनुभव असल्याने अडचण येणार नाही. मला तर वाटते की वातावरणाचा फायदा घेता यायला पाहिजे.

2 शुभमन गिल इंग्लंडमधला पहिला कसोटी सामना खेळणार आहे; पण सध्या ज्या लयीत तो फलंदाजी करत आहे, त्याचा विचार करता तो स्थानिक वातावरणाशी जुळवून घेईल. त्याला प्रदीर्घ काळ खेळपट्टीवर उभे राहणे आवडते, हे विसरून चालणार नाही.

3 दडपणाखाली सर्वोत्तम खेळ करायचे आव्हान भारतीय संघाला खुणावत आहे. दडपणाखाली खेळताना योग्यवेळी योग्य निर्णय घेता येणे यालाच कसोटी क्रिकेट म्हणतात.

4 गेल्या १० वर्षांत मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही, हे सगळे खेळाडू जाणून आहेत. पण त्याविषयी बोलत राहणे बरोबर होणार नाही. कप्तान म्हणून मलाही मोठी स्पर्धा जिंकण्याची ईर्षा आहे.

टॅग्स :Cricketsports