महामुकाबल्यासाठी प्रतिस्पर्धी संघ तयार

महामुकाबल्यासाठी प्रतिस्पर्धी संघ तयार

पुणे - भारत आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीने पुण्याचे गुरुवारी कसोटी क्रिकेटच्या नकाशावर पदार्पण होईल. विराट कोहली आणि स्टीव स्मिथ या समकालीन क्रिकेटमधील दर्जेदार फलंदाजांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघांनी चार कसोटींच्या मालिकेसाठी जय्यत तयारी केली आहे. साहजिकच या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे वर्णन महामुकाबला असे होत असून, चुरस आणि पर्यायाने उत्कंठा शिगेला पोचली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतासमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने फिरकीच्या आघाडीवर कडेकोट मोर्चेबांधणी केली आहे. त्यांच्याकडे चार फिरकी गोलंदाज आहेत. नॅथन लियॉन, स्टीव ओकीफ आणि ॲश्‍टन एजर यांच्या जोडीला मिशेल स्वेप्सन आहे. स्वेप्सनला संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे. त्याला अद्याप कसोटीत संधी मिळालेली नसली तरी, त्याच्या क्षमतेचे खुद्द शेन वॉर्न याने कौतुक केले आहे.

जयंतचे पदार्पण अपेक्षित
अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांच्या जोडीला भारत तिसरा फिरकी गोलंदाज खेळविणार हे स्मिथनेसुद्धा गृहीत धरले आहे. जयंत यादवला पदार्पणाची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. 

डावखुरा स्टार्क धोकादायक
ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीत मदार मात्र मिशेल स्टार्क याच्यावरच असेल. ताशी दीडशे मैल वेगाने मारा करण्याची क्षमता असलेला डावखुरा स्टार्क कोणत्याही खेळपट्टीवर भेदक ठरू शकतो. भारताने कितीही ठरवून चेंडू वळणाऱ्या आखाडा खेळपट्या बनविल्या तरी सकाळचे पहिले सत्र अनुकूल हवामानात निर्णायक हादरे देण्याची क्षमता स्टार्ककडे आहे. साहजिकच त्याचा धोका सर्वाधिक असेल.

स्मिथचा क्रमांक कोणता
फलंदाजीत स्मिथ सहसा चौथ्या क्रमांकावर खेळतो; पण या वेळी डेव्हिड वॉर्नर, शॉन मार्श, मॅट रेनशॉ, उस्मान ख्वाजा हे चौघे डावखुरे आहेत. यात वॉर्नर-शॉन सलामीची जोडी असेल. अशा वेळी तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा डावखुरा फलंदाज येऊ नये, तसेच त्याहून महत्त्वाचे म्हणजे अश्‍विनचे ऑफस्पीन रोखण्याच्या उद्देशाने स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्‍यता आहे. त्यानेच तसे संकेत दिले. स्मिथने गतवर्षी श्रीलंका दौऱ्यात तिसऱ्याच क्रमांकावर शतक काढले होते. भारताविरुद्ध त्याने तीन शतके काढली असून, ती सर्व चौथ्या क्रमांकावर आहेत. या वेळी मात्र त्याला संघासाठी पसंतीच्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे.

अश्‍विनचे यश
मायदेशात अश्‍विनने नऊ कसोटींमध्ये ६१ विकेट मिळविल्या आहेत. त्याच्या २५४ पैकी १३५ विकेट डाव्या, ११९ उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजांच्या आहेत. ११९ पैकी २० जणांना त्याने भोपळाही फोडू दिलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com