कोट राखल्याचेच समाधान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

भारतीय फलंदाजांचीच इंग्लंडकडून फिरकी; कोहली-जडेजाने हार टाळली

राजकोट - ॲलिस्टर कुकला भारतातील कसोटी शतकापासून रोखण्यात टीम इंडिया गोलंदाज अपयशी ठरले. तो या शतकाचा आनंद विजयासहच साजरा करणार असे दिसत होते; पण गोलंदाजीतील अपयशाची भरपाई फलंदाजी करताना अश्‍विन आणि रवींद्र जडेजाने विराट कोहलीस साथ दिली, त्यामुळे भारतास राजकोट राखता आले. २४ षटकांत चार फलंदाज बाद झाल्यावर त्यापेक्षा जास्त वेळ कोहली-अश्‍विन- जडेजाने चिकाटी दाखवली आणि हेच भारताच्या पथ्यावर पडले.  

भारतीय फलंदाजांचीच इंग्लंडकडून फिरकी; कोहली-जडेजाने हार टाळली

राजकोट - ॲलिस्टर कुकला भारतातील कसोटी शतकापासून रोखण्यात टीम इंडिया गोलंदाज अपयशी ठरले. तो या शतकाचा आनंद विजयासहच साजरा करणार असे दिसत होते; पण गोलंदाजीतील अपयशाची भरपाई फलंदाजी करताना अश्‍विन आणि रवींद्र जडेजाने विराट कोहलीस साथ दिली, त्यामुळे भारतास राजकोट राखता आले. २४ षटकांत चार फलंदाज बाद झाल्यावर त्यापेक्षा जास्त वेळ कोहली-अश्‍विन- जडेजाने चिकाटी दाखवली आणि हेच भारताच्या पथ्यावर पडले.  

भारताने या कसोटीत हार टाळल्याचे श्रेय पंच ख्रिस गॅफानी यांनाही द्यायला हवे. त्यांनी अश्‍विनविरुद्ध पायचीतचे अपील फेटाळले. त्यामुळे तो नऊ षटके जास्त टिकला. त्याचे गोलंदाजीतील २३० धावांत ३ बळी हे अपयश विसरले गेले. त्याने पाचव्या दिवशी जास्त साइड ऑन मारा केला; पण त्यामुळे तो केवळ धावाच रोखू शकला. मात्र त्यामुळे इंग्लंडचा डावही लांबला. भारताचा कोसळता दुसरा डाव पाहताना आपण डाव सोडण्यास जरा जास्तच उशीर केला का, हा प्रश्न कुकला सलत असेल. पावसाने व्यत्यय न आणलेल्या यापूर्वीच्या मायदेशातील सलग बारा कसोटी भारताने जिंकल्या आहेत.

खेळपट्टीस दोष देणारे अकरा झेल सुटले, हेही लक्षात घेतील अशीही आशा आहे. इंग्लंडने विजय आणि पुजाराचा झेल सोडत भारतास साथ केली; पण त्याचा फायदा दोघांनीही घेतला नाही. गंभीरचे अपयश मागील पानावरून सुरूच राहिले. घरच्या मैदानावर फिरकीचा सामना करण्यात भारतीय अपयशी ठरत होते. मोईन अलीने रहाणेस चकवून भारतीय संघास संकटातच टाकले होते. कोहली-अश्‍विनला आक्रमण हाच बचाव, हे सूत्र अमलात आणल्याचा फायदा झाला. याच दरम्यान अश्‍विनविरुद्धची एकंदर तीन पायचीतचे अपील फेटाळण्यात आले.  

इंग्लंडने षटके कमी झाल्यावर सर्वच क्षेत्ररक्षक बॅटच्या जवळपास आणले. त्याचबरोबर राखीव खेळाडूंना सीमारेषेजवळ बसवले. ज्याद्वारे चेंडू लगेच परत येईल. त्यातच सीमारेषा पाहण्याची मुभा असलेल्या धर्मवीरने एकदा चेंडू परत केला, हे पाहून कोहली चिडला. भारतीय कर्णधाराचे आक्रमण तसेच बचावाचा संगम उपयुक्त ठरत होता. जडेजाने याच टप्प्यात चेंडूस धाव या गतीने आक्रमण करीत दडपण दूर केले आणि भारताचा बचाव यशस्वी केला.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड, पहिला डाव - ५३७, भारत, पहिला डाव - ४८८, इंग्लंड, दुसरा डाव - ३ बाद २६० घोषित (ॲलिस्टर कुक १३०, हसीब हमीद ८२, बेन स्टोक्‍स्‌ नाबाद २९, मिश्रा २-६०) भारत ः दुसरा डाव ः ६ बाद १७२ (विजय ३१, पुजारा १८, कोहली नाबाद ४९, अश्‍विन ३२, जडेजा नाबाद ३२, रशीद ३-६४)

ॲलिस्टर कूकचे तिसावे शतक
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावात ॲलिस्टर कूकने शतकी खेळी केली. कारकिर्दीतले त्याचे हे तिसावे शतक ठरले. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्‍वातील तेरावा, तर इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. कूकने भारताविरुद्ध सहावे आणि भारताविरुद्ध भारतात पाचवे शतक ठोकले, अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५१ शतके भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याचबरोबर भारताविरुद्ध भारतात एक हजार धावा पूर्ण करणारा कूक (१०१७) चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी अशी कामगिरी क्‍लाईव्ह लॉईड (१३५९-१४ सामने), गॉर्डन ग्रिनिज (१०४२-१४ सामने), मॅथ्यू हेडन (१०२७-११ सामने) यांनी केली आहे. कूकने ही कामगिरी नऊ सामन्यांतच केली आहे. 
संकलन - गंगाराम सपकाळ

Web Title: india vs england test cricket match