
India Vs Ireland 1st T20i Playing XI : आशिया करंडक आणि त्यानंतर होणारी एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा तोंडावर आलेली असताना भारतीय संघ आजपासून आयर्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. निकालापेक्षा जसप्रीत बुमराचे पुनरागमन कसे असेल आणि नव्या पिढीचे खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर भारतीय क्रिकेटचे लक्ष असणार आहे.
पुढच्या पिढीचे शिलेदार म्हणून पाहिले जाणाऱ्या ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, जितेश शर्मा, शिवम दुबे हे आयपीएल गाजवणारे खेळाडू आता या संधीचे सोने कसे करतात यावर लक्ष असणारच आहे; परंतु जसप्रीत बुमरा केंद्रस्थानी असणार आहे.
जेमतेम ५० दिवसांनंतर विश्वकरंडक स्पर्धा होत आहे आणि त्यासाठी बुमरा अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज असणार आहे. त्यासाठी त्याचा मॅच फिटनेस कसा असेल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेअगोदर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत बुमराच्या पाठीला स्ट्रेस फॅक्टरची दुखापत झाली. त्यानंतर शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन अशा मार्गावरून जात तो पुन्हा खेळण्यास सज्ज झाला आहे.
आयर्लंडविरुद्धची ही मालिका पाच दिवसांत होणाऱ्या तीन सामन्यांची आहे, म्हणजे बुमरा जास्तीत जास्त १२ षटके गोलंदाजी करेल, यात बुमरा किती विकेट घेतो यापेक्षा त्याचा मॅचफिटनेस कसा आहे यावर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे बारकाईने लक्ष असेल. कारण आशिया करंडक आणि विश्वकरंक ही ५०-५० षटकांची स्पर्धा असणार आहे. त्यात बुमराला एका सामन्यात १० षटके गोलंदाजी करावी लागेल. या पार्श्वभूमीवर बुमराचा मॅचफिटनेस महत्त्वाचा ठरणार आहे.
बीसीसीआयने कालच भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला, त्यात बुमरा पूर्ण जोशात गोलंदाजी करताना दिसत होता. त्याने यॉर्करसह उसळते चेंडूही टाकले.
पाठीची ही दुखापत बुमराला अगोदरपासून सतावत होती. त्यासाठी तो काही काळ क्रिकेटपासून दूरही होता. तो तंदुरुस्त झाला असे निदान करून त्याला ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत खेळवण्याची घाई करण्यात आली, पण ही घाई नडली. बुमरा प्रदीर्घ काळ पुन्हा मैदानाबाहेर गेला. यात त्याला शस्त्रक्रियाही करायला लागली. त्यामुळे आता बुमराच्या प्रत्येक हालचालीबरोबर तो गोलंदाजी केल्यानंतर किती तंदुरुस्त असतो याचे विश्लेषण केले जाईल.
आयपीएलमध्ये प्रभाव पाडणारा विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. संजू सॅमसनला वेस्ट इंडीजमधील मालिकेत संधी देण्यात आली होती; परंतु तो यशस्वी ठरला नव्हता. त्यामुळे जितेशचा पर्याय आता तपासला जाऊ शकेल.
बुमराप्रमाणेच कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला दुखापत झाली आणि त्यालाही पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. तोही प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे त्याच्याही तंदुरुस्तीवर लक्ष असेल.
सामन्याची वेळ ः सायंकाळी ७.३० पासून
थेट प्रक्षेपण ः जिओ सिनेमा