''मुसंडी मारायचीये तर वेगळे प्रयत्न करावेच लागतील''

India vs New Zealand 2nd T20 preview by Sunandan Lele
India vs New Zealand 2nd T20 preview by Sunandan Lele

ऑकलंड : ईडन पार्कवरचा पहिला सामना जिंकून भारतीय संघाने दौर्‍याची सुरुवात मस्त केली. अत्यंत कमी वेळ वातावरणाशी जुळवून घ्यायला मिळूनही भारतीय संघाने दणकेबाज कामगिरी करून दाखवली. न्युझीलंडचा सर्वात अनुभवी खेळाडू रॉस टेलर भेटला तेव्हा म्हणाला, ‘‘पहिल्या सामन्यात ज्या सहजतेने भारतीय संघाने 204 धावांचा पाठलाग केला त्याचा विचार करता न्युझीलंड संघाला टी20 मालिकेत मुसंडी मारायची असेल तर वेगळे प्रयत्न करावे लागतील’’.

एक दिवसाची विश्रांती आणि एकच सरावाचे सत्र इतकेच भारतीय संघाला पहिल्या टी20 सामन्याअगोदर स्थानिक वातावरणाशी जुळवून घ्यायला मिळाले होते. वाटले होते की कसा निभाव लागणार भारतीय संघाचा. पण झाले उलटेच. गोलंदाजी करताना गेलेला थोडासा तोल फलंदाजांनी सांभाळून घेतला आणि 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 आघाडी घेतली.

‘‘प्रथम फलंदाजी करताना सगळे सुरळीत चालू होते. आम्ही मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होतो. ईडन पार्कचे मैदान थोडे विचित्र आहे आकाराला. ज्याने इथे खेळताना प्रत्येकवेळी वेगळे आव्हान समोर उभे राहते. मधल्या काही षटकात महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्याने आमची धावगती किंचित मंदावली. भारतीय फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा केल्याने तसे झाले. त्याचमुळे अपेक्षेपेक्षा 20 धावा कमी झाल्या ज्याचा फटका गोलंदाजी करताना बसला’’, रॉस टेलर म्हणाला.

खेळपट्टीवर स्थिरावलेले के एल राहुल आणि विराट कोहली पाठोपाठ बाद झाले तेव्हा भारतीय संघाला अजून 80पेक्षा जास्त धावा जमा करायच्या होत्या आणि अपेक्षित धावगतीही 10च्या पुढे होती. ‘‘झाले आहे काय की आयपीएल खेळून भारतीय संघातील खेळाडू टी20 सामन्यात दडपणाला घाबरत नाहीत. श्रेयस अय्यरची खेळी त्याचे उदाहरण आहे. दडपणाखाली त्याने फारच सुरेख आक्रमक फलंदाजी करून सामना आमच्यापासून दूर नेला’’, रॉस टेलरने मान्य केले.

वर्ल्डकप दरम्यान मधल्या फळीत सामना जिंकून देणारा चांगला फलंदाज नव्हता हे श्रेयस अय्यरच्या खेळीतून दिसून यायला लागले आहे. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने श्रेयस अय्यरला संधी नाकारून किती मोठी चूक केली हे आता समजून येत आहे. दुसरीकडे न्युझिलंड संघाला गेल्या काही सामन्यात सतत पराभवाचा सामना करावा लागल्याने दडपणाचा बोजा केन विल्यमसनवरचा वाढत आहे. दुसर्‍या सामन्यात यजमान संघ अजून जास्त तडफेने भारतीय संघावर बाजी उलटवण्याचा प्रयत्न करेल हे नक्की आहे.

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर लगेच रविवारी दुसरा टी20 सामना त्याच ईडन पार्क मैदानावर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात म्हणावे तसे प्रेक्षागृह खचाखच भरले नव्हते. पहिल्या सामन्यातील भारतीय संघाची चांगली कामगिरी बघून सुट्टीच्या दिवशी ऑकलंडवासी ईडन पार्क भरून टाकतील असा विश्वास संयोजकांना आहे. ‘‘मायदेशात असो भारतात असो किंवा त्रयस्थ जागी असो, ज्या प्रकारे भारतीय पाठीराखे मैदानावर गर्दी करून संघाला पाठिंबा देतात ते बघता भारतीय संघासमोर सामना खेळताना आम्हांला नेहमी वाटते की भारतीय संघच घरच्या मैदानावर खेळत आहे’’, रॉस टेलर हसत हसत म्हणाला.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com