World Cup 2019 : सोहेलनं प्रसादला डिवचलं.. मग त्याला मिळाला 'करारा जबाब'

शनिवार, 15 जून 2019

भारत-पाकिस्तान लढतींमध्ये कमालीची चुरस होत असते. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन संघ एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यासाठी प्रसंगी आक्रमक देहबोली प्रदर्शित करून किंवा शेरेबाजी करून दडपण आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो

वर्ल्ड कप 2019 : भारत-पाकिस्तान लढतींमध्ये कमालीची चुरस होत असते. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन संघ एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यासाठी प्रसंगी आक्रमक देहबोली प्रदर्शित करून किंवा शेरेबाजी करून दडपण आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो, पण या गोष्टी "लिमिट'मध्येच करायच्या असतात, अन्यथा दडपणामुळे जवळपास ढेपाळलेला प्रतिस्पर्धी विनाकारण डिवचला जातो आणि मग तो चवताळून वचपा काढून स्वस्थ बसतो.

1996 च्या स्पर्धेत पाकिस्तानचा हंगामी कर्णधार आमीर सोहेल याला हाच धडा मिळाला. बंगळूरला उपांत्यपूर्व फेरीत भारताने 287 धावा केल्या होत्या. सोहेल आणि सईद अन्वर यांनी 84 धावांची सलामी दिली होती. जवागल श्रीनाथने अन्वरला बाद केले, पण सोहेलचा धडाका सुरूच होता. त्याने संघाचे शतकही फलकावर लावले. तो वेगवान गोलंदाजांना तर दादच देत नव्हता. त्यातही वेंकटेश प्रसादची बरीच धुलाई झाली होती. "होमग्राऊंड' असूनही एका स्टॅंडमधील प्रेक्षकांनी प्रसादची हुर्यो उडविली होती. त्यातच सोहेलने पुढे सरसावत प्रसादला "एक्‍स्ट्रॉ कव्हर'ला सणसणीत चौकार मारला. चेंडू सीमापार होताच तो थोडा पुढे गेला आणि त्याने सीमारेषेच्या दिशेने बॅट दाखविली. हे करताना त्याने शेरेबाजीही केली. "जा जाऊन चेंडू घेऊन ये. तुझी तीच जागा आहे. तीच तुझी लायकी आहे,' अशा आशयाचे वक्तव्य करीत त्याने प्रसादला "चार शब्द' सुनावले.प्रसाद त्यामुळे डिवचला गेला, पण त्याने तोल ढळू दिला नाही. तो शांतपणे "रनअप'पाशी गेला आणि त्याने पुढचा चेंडू अफलातून टाकत सोहेलचा "ऑफ स्टंप' उखडला. मग मात्र प्रसाद शांत बसला नाही. त्याने "पॅव्हेलियन'च्या दिशेने हात केला आणि सोहेलला "गेट आउट'चा आदेश दिला!

या नाट्यमय घटनेनंतर चिन्नास्वामी स्टेडिअमवरील सुमारे 35 हजार प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी स्टेडिअम डोक्‍यावर घेत भारताला "चिअर अप' करण्यास सुरवात केली. प्रसादने मग इजाझ अहमद आणि इंझमाम उल हक हे आणखी दोन मोहरे गारद केले. त्यानंतर "डेंजरमॅन' जावेद मियॉंदाद, सलीम मलिक, असे खेळाडू असूनही भारताने विजय खेचून आणला.

त्या सामन्याच्या वेळी पाकचे विश्‍वविजेते कर्णधार इम्रान खान समालोचन करीत होते. त्यांनी सोहेलच्या कृत्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. त्या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आणखी एक शोकांतिका म्हणजे त्यामुळे मियॉंदादच्या वन-डे कारकिर्दीचा शेवट पराभवाने झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs Pakistan best memories from World Cup history