India vs South Africa :  'विराट'सेना आजपासून लढणार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

भारताच्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसमास उद्यापासून सुरवात होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन ट्‌वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना निसर्गरम्य अशा धरमशाला येथील स्टेडियमवर होत आहे.

धरमशाला -  भारताच्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसमास उद्यापासून सुरवात होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन ट्‌वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना निसर्गरम्य अशा धरमशाला येथील स्टेडियमवर होत आहे; पण ही मालिका पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्‌वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी नवोदितांची चाचणी परीक्षा असेल.

विद्यमान विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजला टी-२० मालिकेत ३-० असा व्हाइटवॉश दिल्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या मालिकेतही निर्भेळ यश मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. विश्रांती दिलेल्या जसप्रीत बुमराचा अपवाद वगळता सर्व प्रमुख खेळाडू मैदानात उतरणार आहेत.  

विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी भारत सुमारे २० ट्‌वेन्टी-२० सामने खेळणार आहे, त्यामुळे येथून पुढे काही सामन्यांत प्रयोग केले जाणार आहेत. नवोदितांना आलटून पालटून संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे, प्रामुख्याने दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी या वेगवान गोलंदाजांवर अधिक लक्ष असेल. हार्दिक पंड्या पुनरागमन करत असल्यामुळे भारताची ताकद वाढली आहे.

रिषभ पंतवर लक्ष
यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या कामगिरीवर निवड समितीबरोबर संघ व्यवस्थापनाचेही लक्ष असेल. टी-२० वर्ल्डकपपर्यंत निवड समिती पंतबरोबर दुसरा पर्याय शोधण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे पंतला प्रत्येक सामन्यात आपले योगदान द्यावे लागणार आहे.  

उद्याच्या पहिल्या सामन्यात पांडेला प्राधान्य मिळण्याची अधिक शक्‍यता आहे. फिरकी गोलंदाजीत फॉर्मात असलेल्या रवींद्र जडेजाला अंतिम संघात स्थान मिळू शकते. दोन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा विचार झाला, तर युझवेंद्र चहलला पसंती मिळेल. कृणाल पंड्याची जागा त्याचा भाऊ हार्दिक घेऊ शकेल.

हा भारत दौरा आमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा नवा कर्णधार क्विनटॉन डिकॉकने अगोदरच सांगितले आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत साखळीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर आफ्रिकेचा संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. आफ्रिकेची मदार डिकॉकसह कागिसो रबाडा आणि डेव्हिड मिलर यांच्यावरच असेल. 

अंतिम संघ यातून निवडणार
भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका - क्विनटॉन डिकॉक (कर्णधार), रासी वॅनडर दुसेन, तेंबा वाऊमा, ज्युन डेल, बिॲन फॉर्टन, ब्युरम हेंद्रिक्‍स, रेझा हेंद्रिक्‍स, डेव्हिड मिलर, अर्निच नॉर्टज्‌, अँडिले फेलुकवायो, द्वेन प्रिटोरिस, कागिसो रबाडा, ताब्रेझ शम्शी, जॉर्ज लिंडे. (थेट प्रक्षेपण ः सायंकाळी ७, स्टार स्पोर्ट्‌स.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs South Africa first T20