मालिका विजयाची संधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

तिरुअनंतपुरम - मुंबईत बाजी मारल्यावर आता केरळच्या देवभूमीतही विजय मिळवून वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मायदेशात २०१५ पासून सुरू केलेल्या मालिका विजयाचे अखंडत्व कायम ठेवण्याचा निर्धार विराट कोहलीच्या संघाने केला आहे.

तिरुअनंतपुरम - मुंबईत बाजी मारल्यावर आता केरळच्या देवभूमीतही विजय मिळवून वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मायदेशात २०१५ पासून सुरू केलेल्या मालिका विजयाचे अखंडत्व कायम ठेवण्याचा निर्धार विराट कोहलीच्या संघाने केला आहे.

पाच सामन्यांची ही मालिका सुरू झाली तेव्हा भारताचे निर्विवाद वर्चस्व अपेक्षित होते; परंतु नवख्या विंडीज संघाने चांगला प्रतिकार केला. एक सामना बरोबरीत तर एका सामन्यात विजय अशी कामगिरी त्यांनी केली; परंतु दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी तसेच गोलंदाजीतही ताकद दाखवून वर्चस्व मिळवले. विंडीज संघात काही खेळाडू तोडीस तोड उत्तर देण्याच्या क्षमतेचे असल्यामुळे भारतीयांना सावधच राहावे लागणार आहे.

तिरुअनंतपुरम (तत्कालीन त्रिवेंद्रम) येथे या अगोदर याच दोन संघात अखेरचा सामना झाला होता. त्या वेळी जागतिक क्रिकेटमध्ये सुपरपॉवर असलेल्या विंडीजने तो सामना जिंकला होता. आता जेसन होल्डरचा संघ आपल्या माजी खेळाडूंकडून स्फूर्ती घेऊन मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल; पण फॉर्मात असलेल्या भारताला रोखणे आता सोपे जाणार नाही.

तिसऱ्या सामन्यांपर्यंत भारताला मधल्या फळीचा प्रश्‍न भेडसावत होता; परंतु मुंबईत अंबाती रायुडूने चमकदार शतक केले. तसेच त्यानंतर केदार जाधव आणि रवींद्र जडेजा असे अष्टपैलू खेळाडू असल्याने मधल्या फळीची चिंता राहिलेली नाही. परिणामी मुंबईत घाम गाळावा लागलेल्या विंडीज गोलंदाजांना पुन्हा एकदा परिश्रम करावे लागतील.

एकीकडे भारतीय फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असताना विंडीजला कामगिरीत सातत्य राखणाऱ्या ॲशले नर्स या फिरकी गोलंदाजाच्या दुखापतीची चिंता आहे. मुंबईतील सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे उद्याच्या सामन्यासंदर्भात प्रश्‍नचिन्ह आहे.

Web Title: india vs west indies chance to win the series