World Cup 2019 : भारताची गोलंदाजी बेस्ट अन् म्हणूनच त्यांचे पारडे जड 

World Cup 2019 : भारताची गोलंदाजी बेस्ट अन् म्हणूनच त्यांचे पारडे जड 

वर्ल्ड कप 2019 : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सफाईदार आणि धूर्त खेळाच्या जोरावर विजय मिळविला. भारतीय संघाचे संतुलन पाहून मी भारावून गेलो आहे. इतका सुसंघटित भारतीय संघ मी कधीही पाहिला नव्हता. मला पूर्वीच्या कोणत्याही महान खेळाडूचा अनादर करायचा नाही, हे लक्षात घ्या. अगदी सुरवातीपासूनच प्रतिस्पर्ध्याला घेरण्याची त्यांची वृत्ती मला आवडते. ऑस्ट्रेलियन संघ अशाच पद्धतीने खेळायचा आणि आता भारतीय संघ हीच वृत्ती प्रदर्शित करीत आहे. 

पुढील सामन्याआधी कर्णधार विराटला मात्र काही विषय मार्गी लावावे लागतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित आणि धवन यांनी अद्वितीय खेळ केला. धवनच्या दुखापतीमुळे बदल करणे भाग पडेल. त्याची सलामीची जागा राहुल घेईल. मी नेहमीच धवनचा मोठा चाहता राहिलो आहे. काही वेळा तो रोहितमुळे झाकोळला जातो. किवींविरुद्ध भारताला त्याची उणीव नक्कीच जाणवेल. दुसरा मुद्दा म्हणजे मध्य फळीत कोण येणार? माझी पसंती शंकरला असेल. या तरुणाला किवींचा संघ तोंडपाठ आहे.

गेल्या वर्षी "अ' संघांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध तो "सर्वोत्तम' ठरला होता, हे फार थोड्या जणांना ठाऊक आहे. मुख्य संघ आमनेसामने आले तेव्हा वेलिंग्टनला 4 बाद 18 अशा घसरणीनंतर त्यानेच संघाला तारले होते. तो मध्यमगती गोलंदाजी करू शकतो. त्याच्यासाठी इंग्लंडमधील वातावरण पोषक ठरेल. त्याच्या रूपाने विराटला अतिरिक्त "सीम' गोलंदाजाचा पर्याय मिळेल, जे संघासाठी उपयुक्‍त ठरेल. मी विराटच्या जागी असेन तर कार्तिकऐवजी शंकरला नक्कीच निवडेन.

चिंता करण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे हवामान. ढगाळ आणि कोंदट हवा तसेच पावसाच्या सरींची शक्‍यता, असे वातावरण किवींसाठी उत्तम ठरेल. भारताच्या बलाढ्य फलंदाजीला रोखण्याची क्षमता कोणत्या गोलंदाजांकडे असेल तर ते आहेत किवींचे. 11 जूनअखेरच्या गुणतक्‍त्यानुसार किवी आघाडीवर आहेत. अनुकूल हवामानात खेळण्याचा आनंद ते लुटतील याची खात्री आहे. हवामान अनुकूल असेल तर चेंडूसह भन्नाट मारा करण्याची क्षमता असलेल्या काही गोलंदाजांमध्ये बोल्टचा समावेश होतो. त्याला आवडते हवामान मिळेल असाच अंदाज आहे. गेले तीन दिवस नॉटिंगहॅमला पावसाने धुतले आहे. हवामान बदलले नाही तर खेळपट्टीवर "कव्हर्स' कायम राहतील. एक वेगवान गोलंदाज असल्यामुळे मी बोल्टची इच्छा काय असेल ते सांगू शकतो आणि यास त्याची हरकत अजिबात नसेल. 

यंदा हॅमिल्टनला किवींनी भारताला 92 धावांत गुंडाळले होते, हे विसरू नका. सराव सामन्यात ओव्हलवरही किवींनी भारताला 179 धावांत बाद केले होते. दोन्ही वेळा बोल्टने धक्के दिले होते. 

अर्थात न्यूझीलंडकडे बोल्ट असेल तर मग भारताकडे बुमरा-भुवी-शमी असे त्रिकुट आहे. यामुळेच मला हा संघ सर्वाधिक संतुलित वाटतो. एका स्पीनरऐवजी शमी खेळेल आणि कुलदीपला काढले जाईल असे वाटते. बुमरा, शमी, भुवी, हार्दिक व शंकर असे पाच वेगवान वीर आणि चहल-केदार असे दोन स्पीनर इतके पर्याय भारताकडे असतील. इतकी संतुलित गोलंदाजी कुणाकडे आहे हे मला सांगा बरे. भारताने अलीकडेच न्यूझीलंडला 4-1 असे हरविले. संतुलित संघामुळे आणखी एका विजयाची भारताला संधी असेल. 
आणखी एक चुरशीचा सामना रंगणार आहे. बोल्ट धडाडेल किंवा नाही, सूर्यप्रकाश असो किंवा नसो, खेळपट्टीवर चेंडू सीम होवो अथवा न होवो...कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता या भारतीय संघात आहे. माझ्या मते भारत "फेव्हरीट' आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com