INDvsBAN : अडीच दिवसांतच बांगलादेशी वाघांची शिकार; भारताचा डावाने दणदणीत विजय

सुनंदन लेले
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

मुश्फीकूर रहीमचा अपवाद वगळता बाकी बांगलादेशी फलंदाजांना साधा मुकाबला करणेही जमले नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांनी साफ नांगी टाकली. अखेर तिसर्‍या दिवशीचा खेळ संपण्याअगोदरच भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावात गुंडाळून संघाला एक डाव 130 धावांचा भलामोठा विजय मिळवून दिला.

इंदूर : मुश्फीकूर रहीमचा अपवाद वगळता बाकी बांगलादेशी फलंदाजांना साधा मुकाबला करणेही जमले नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांनी साफ नांगी टाकली. अखेर तिसर्‍या दिवशीचा खेळ संपण्याअगोदरच भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावात गुंडाळून संघाला एक डाव 130 धावांचा भलामोठा विजय मिळवून दिला. महंमद शमीने चांगलाच तिखट मारा करून चार  फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. द्विशतक ठोकणार्‍या मयांक आगरवालला सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले.

हृदयस्पर्शी गुडबाय! सचिनसह त्याच्या चाहत्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला
दुसर्‍या दिवशीच्या धावफलकावरच भारतीय कप्तान विराट कोहलीने डाव घोषित केला तेव्हा तिसर्‍याच दिवशी सामना संपवायचा विचार घोळताना दिसला. दुसर्‍या डावाच्या सुरुवातीला सलामीला आलेल्या इमरूल कयास आणि शादमन इस्लाम जोडीला तंबूत पाठवताना जास्त घाम गाळावा लागला नाही. दोनही फलंदाज टप्पा पडून आत येणार्‍या चेंडूंवर बोल्ड झाले. उमेश यादवने इमरूल कयासला आणि इशांत शर्माने शादमन इस्लामला बाद केले. महंमद शमीने कप्तान मोमीनुल हकला पायचित केल्यावर वेगवान गोलंदाजीची मस्त लय पकडली.  

मधल्या फळीतील महंमद मिथुन आणि महमुदल्लाने माफक प्रतिकार करायचा प्रयत्न केला जो महंमद शमीने मोडून काढला. त्याच टप्प्यात महंमद शमीने केलेली वेगवान गोलंदाजी बघण्यालायक होती. प्रत्येक वेळी मारा करताना शमीचे चेंडूची शिवण बरोबर असायची. अचूक शिवणीवर चेंडू टाकत राहिल्याने चेंडू कधी आत तर कधी बाहेर स्वींग होत होताच वर चांगलाच उसळी घेत होता. महंमद शमीच्या त्याच मार्‍यात मुश्फीकूर रहीमचा अत्यंत सरळ झेल रोहित शर्माने सोडला. शमीने हार न मानता महंमद मिथुन आणि मेहमदुल्लाला बाद केले.

7व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लीटन दासने वेगवान मार्‍याला चांगले तोंड देत 6 चौकार मारले. लीटन दास आणि मुश्फीकूर रहीमची जोडी जमली होती. दोघांच्यात अर्धशतकी भागीदारीही रंगली. जम बसलेला असताना लीटन दासने अश्विनच्या फिरकीला पुढे सरसाव फटका मारायची घाई केली. दासची विकेट गेल्यावर मेहदी मीराजने धाडसी फलंदाजी करून मुश्फीकूर रहीमसह थोडावेळ किल्ला लढवला. चिवट मुश्फीकूरने अर्धशतकही पूर्ण केले.  

 

IPL 2020 : कोणत्या संघाने वगळले कोणते खेळाडू? पाहा पूर्ण यादी

चहापानानंतर उमेश यादवने मेहदी मीराजला 38 धावांवर बाद करून विजयाचे दरवाजे उघडले. अश्विनने मुश्फीकूर रहीमला 64 धावांवर बाद केल्यावर उरलासुरला प्रतिकार संपला. इबादत हुसेनला अश्विनने बाद करून भारताचा एक डाव 130 धावांचा विजय नक्की केला. तिसर्‍या दिवशी महंमद शमीने चार फलंदाजांना बाद करू सर्वात जास्त छाप पाडली. शमीला उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी २ फलंदाज बाद करून उत्तम साथ दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India wins the 1st test match by an inning and 130 runs against Bangladesh