पंड्यानं अडकवलं.. रोहितनं बदडलं; भारताचा सहज विजय!

शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

कृणाल पंड्याच्या फिरकीनंतर रोहित शर्मा, शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले.

वेलिंग्टन : कृणाल पंड्याच्या फिरकीनंतर रोहित शर्मा, शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले.

किवींने दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी आज कोणताही चूक केली नाही. रोहितने पहिल्या षटकापासूनच फटकेबाजीला सुरवात केली. त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये अर्धशतक नोंदवले. याच कामगिरीसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्वेंटी20 प्रकरात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र त्यानंतर लगेचच ईश सोढीने त्याला बाद केले. 

भारतीय संघ फलंदाजीमध्ये सध्या वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. पहिल्या सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर विजय शंकरला पाठविण्यात आले होते. ही जबाबदाकी आज रिषभ पंतकडे सोपविण्यात आली. त्यानेही ती अचूपणे पार पाडली. शिखर धवन बाद झाल्यावर त्याने गुरु महेंद्रसिंह धोनीच्या साथीत भारताला विजय मिळवून दिला. त्याने 28 चेंडूंमध्ये नाबाद 40 धावा केल्या तर धोनीने 17 चेंडूंमध्ये नाबाद 20 धावा केल्या. पंत आणि धोनी यांनी भारताला सात चेंडू राहिले असतानाच विजय मिळवून दिला.