मोहालीत विराट कोहली बरसला

शैलेश नागवेकर 
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.

दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय 
मोहाली - शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. 

तीन वर्षांपूर्वी याच मैदानावर ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक सामन्यात विराट कोहलीने तुफानी खेळी करून ऑस्ट्रेलियाला शरण आणले होते. आज दक्षिण आफ्रिकेच्या गोलदाजांनी तशीच अवस्था केली त्यामुळे विजयासाठी असलेले 150 धावांचे आव्हान भारताने 19 षटकांत पार केले. 

दक्षिण आफ्रिकेच्या 19 व्या षटकांत सीमारेषेवरून चेंडू फेकल्यानंतर विराटने पाठ पकडली होती. लगेचच तो ड्रेसिंगरुमध्ये परतला आणि चौथ्या षटकात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजी आलेल्या विराटच्या फलदांजीत कोठेही काही वेळापूर्वी पाठ दुखावल्याचे जाणवत नव्हते. चार चौकार आणि तीन षटकारांसह त्याने संघाचा विजय सोपा केला. 

रोहित आणि धवन यांनी दहा धावांच्या सरासरीने 33 धावांची सलामी देऊन भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर डेव्हिड मिलरने धवनचा अप्रतिम झेल पकडला मात्र दुसऱ्या बाजूने विराटचा तडाखा कायम होता. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रिषभ पंतने पुन्हा एकदा निराशा केली मात्र श्रेयस अय्यरने दुसऱ्या बाजूने आपल्या कर्णधाराला अपेक्षित साथ दिली. 

त्या अगोदर प्रथम फलंदाजी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेला प्रथमच नेतृत्व करत असलेल्या डिकॉकने अर्धशतकी खेळी करून आश्‍वासक सुरुवा करून दिली. त्याला बावूमाने साथ दिली मात्र हे दोघे बाद झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गतीला ब्रेक लावले. मात्र सैनीच्या अखेरच्या षटकांत दोन षटकार मारण्यात आल्यामुळे भारतासमोर 150 धावांचे आव्हान मिळाले. 

संक्षिप्त धावफलक -
दक्षिण आफ्रिका - 20 षटकांत 5 बाद 149 (क्विन्टॉन डिकॉक 52 -37 चेंडू, 8 चौकार, तेम्बा बावूमा 49 -43 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, डेव्हिड मिलर 18 -15 चेंडू, 1 षटकार, दीपक चहर 4-0-22-2, नवदीप सैनी 4-0-34-1, रवींद्र जडेजा 4-0-31-1) पराभूत वि. भारत - 19 षटकांत 3 बाद 151 (शिखर धवन 40 -31 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, विराट कोहली नाबाद 72 -52 चेंडू, 4 चौकार, 3 षटकार, श्रेयस अय्यर नाबाद 10 -14 चेंडू, 2 चौकार, फेलुकवायो 3-0-20-1, शम्सी 3-0-19-1)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India wins 2nd t20 against South Africa