भारतीय कुमार हॉकीचे नवाब

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

मुंबई - लखनौच्या गडद धुक्‍यातून प्रकाशझोतात लखलखणाऱ्या मैदानात भारतीय कुमार हॉकीपटू सूर्याइतके तळपले. त्यांनी विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील भारताचा पंधरा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर जणू रिओ ऑलिंपिकमधील पराभवाचेही एकप्रकारे उट्टे काढले. भारतीय कुमार संघाने लखनौच्या हॉकी रणभूमीत आपणच नवाब असल्याचे दिमाखात सिद्ध केले.

मुंबई - लखनौच्या गडद धुक्‍यातून प्रकाशझोतात लखलखणाऱ्या मैदानात भारतीय कुमार हॉकीपटू सूर्याइतके तळपले. त्यांनी विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील भारताचा पंधरा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर जणू रिओ ऑलिंपिकमधील पराभवाचेही एकप्रकारे उट्टे काढले. भारतीय कुमार संघाने लखनौच्या हॉकी रणभूमीत आपणच नवाब असल्याचे दिमाखात सिद्ध केले.

तीन तपानंतर ऑलिंपिक हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम भारतीय हॉकी संघाने केला होता; पण बेल्जियमने भारताचा हा आनंद काही तासही टिकू दिला नाही. भारतास त्या वेळी 1-3 हार पत्करावी लागली होती. भारतीय कुमार संघाने विश्‍वकरंडकाच्या अंतिम लढतीत याची सव्याज परतफेड करताना 2-1 अशी बाजी मारली आणि त्यानंतर या लढतीस उपस्थित असलेले वरिष्ठ संघातील हॉकीपटू, तसेच राष्ट्रीय मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्सही सुखावले.

हे विजेतेपद लखनौतील हॉकीरसिकांचेही आहे. त्यांनी अंतिम लढतीत भारताला सातत्याने जोरजोरात ओरडून प्रोत्साहन दिले. ते अखेरच्या मिनिटापर्यंत थांबवले नाही. अखेरच्या मिनिटात बेल्जियमचा प्रतिकार सुरू झाल्यावर इंडिया... इंडिया.... असा गजर करीत बेल्जियमवर दडपण आणले.

आठव्या मिनिटास गुरजंत सिंगने रिव्हर्स हिटवर अफलातून गोल करीत भारताचे खाते उघडले, तर सिरमनजित सिंगने 22 व्या मिनिटास स्पर्धेतील त्याचा तिसरा गोल करीत भारताची आघाडी वाढवली. व्हॅन बॉकरिक फॅब्रिस याने गोल केल्यावर काही सेकंदातच लढत थांबली. या गोलमुळे बेल्जियमला भारतास धवल यशापासून रोखल्याचेच समाधान लाभले. अर्थात भारतीय संघ 2001 च्या गगन अजित सिंगच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार याबद्दल सर्वांनाच खात्री होती. लखनौच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवरील या लढतीत स्पर्धेत सर्वोत्तम गोलरक्षक ठरलेल्या लॉइक व्हॅन डोरेन याचा बचाव सहज भेदत सुरुवातीच्या 22 मिनिटांत दोनदा भेदत लढतीचा निर्णय केला.

भारताच्या या विजयाचे श्रेय गोलरक्षक विजय दहिया यालाही द्यायला हवे. ऑस्ट्रेलियाचे दोन पेनल्टी शॉट रोखलेल्या दहियाने बेल्जियमची अंतिम टप्प्यातील तिखट आक्रमणे रोखली. 67 व्या मिनिटास तर बेल्जियम आक्रमकासमोर दहियास चकवण्याचेच आव्हान होते. त्याने ताकदवान फटकाही मारला, पण दहियाने झेपावत चेंडू रोखत बेल्जियमला गोलपासून वंचित ठेवले. बेल्जियमने पंधरा सेकंद असताना गोल केला, त्या वेळी दहियाच्या चपळाईचे महत्त्व जास्तच वाढले.

थोडक्‍यात स्पर्धा
- भारताने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही
- ही स्पर्धा एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारा भारत हा दुसरा संघ, जर्मनी सहा वेळा
- बेल्जियमने उपांत्य लढतीत सहा वेळच्या विजेत्या तसेच हॅटट्रिकची संधी असलेल्या जर्मनीस हरवले होते
- भारतास या वर्षाच्या सुरवातीस स्पेनमध्ये झालेल्या चौरंगी स्पर्धेत बेल्जियमविरुद्ध हार पत्करावी लागली होती
- ही स्पर्धा जिंकणारा भारत पहिला यजमान देश
- स्पेनचा एन्‍रिक कॅसेयॉन गोन्झालेझ स्पर्धेचा मानकरी
- इंग्लंडच्या एडवर्ड होर्लरचे सर्वाधिक 8 गोल
- बेल्जियमचा लोईक व्हॅन डोरेन सर्वोत्कृष्ट गोलरक्षक
- गुरजंत सिंग अंतिम सामन्याचा मानकरी

Web Title: india wins Junior hockey World Cup