रोहितने फोडले धावांचे फटाके

वृत्तसंस्था
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली.

लखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली. संथ खेळपट्टी आणि लांब सीमारेषेमुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडणार नाही, हा अंदाज एकट्या रोहितने आपल्या फटकेबाजीने खोटा ठरविला; पण विंडीजने हाच अंदाज जणू खरा ठरवत भारताचा विजय सोपा केला. 

भारतास प्रथम फलंदाजी देण्याचा विंडीजचा निर्णय चुकला असल्याचे रोहित शर्माने दाखवले. त्याने संघाच्या निम्म्याहून जास्त धावा केल्या. रोहितने केलेल्या 111 धावा करण्यापूर्वीच विंडीजचे 7 फलंदाज बाद झाले होते. या परिस्थितीत भारताचा विजय स्पष्ट होता. दुसऱ्या षटकात होप परतल्यावर विंडीजने आशाच सोडल्या. आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी डेव्‌न ब्राव्हो सोडल्यास कोणालाही विशी पार करता आली नाही. विंडीजचा डाव 9 बाद 124 असा मर्यादित राहिला. भारताच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेतली आणि खलिल अहमद सोडल्यास कोणीही षटकामागे सहापेक्षा जास्त धावा दिल्या नाहीत. 

शिखर धवनच्या साथीत डाव सुरू करणाऱ्या रोहितने स्थिरावण्यास काहीच षटके घेतली. लय गवसल्यावर त्याने लखनौच्या मैदानावर धावांचे फटाके असे काही फोडले की, त्याचा आवाज अवघ्या क्रिकेट विश्‍वात घुमला. शिखरचीदेखील त्याला साथ मिळत होती. रोहितने वरचा गियर टाकून फलंदाजीला सुरवात केल्यावर शिखरकडे दुसऱ्या बाजूने बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काहीच नव्हते. 

विंडीजचे गोलंदाज रोहितसमोर हतबल ठरत असताना शिखरने त्याचाच कित्ता गिरविण्याच्या नादात आपली विकेट दिली. तीच चूक बढती मिळालेल्या रिषभ पंतने केली. चौदाव्या षटकापर्यंत विकेट न गमाविणाऱ्या भारताला नंतर दोन षटकांत दोन गडी गमवावे लागले; पण त्याचा कोणताच परिणाम रोहितच्या एकाग्रतेवर झाला नाही. रोहितने चौकार, षटकारांची आतषबाजी करताना टी-20 मधील चौथे शतक साजरे केले. लोकेश राहुलने त्याला 14 चेंडूंत 26 धावा करत सुरेख साथ दिली. त्याने डावातील जवळपास निम्मे चेंडू खेळले; पण निम्म्यापेक्षा जास्त धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक 
भारत : 2 बाद 195 (रोहित शर्मा नाबाद 111- 61 चेंडूंत 8 चौकार व 7 षटकार, शिखर धवन 43, लोकेश राहुल नाबाद 26) वि.वि. वेस्ट इंडीज 9 बाद 124 (ड्‌वेन ब्राव्हो 23, किएरॉन पॉल 20, भुवनेश्‍वर 2-12, खलिल अहमद 2-30, बुमरा 2-20, कुलदीप 2-32). 

रो"हिट' विक्रम 
- रोहित शर्माच्या ट्‌वेंटी-20 मध्ये आता 2108 धावा. 
- ट्‌वेंटी-20 मधील सर्वाधिक धावांच्या क्रमवारीत रोहित अव्वल, विराट कोहलीस (2102) मागे टाकले. 
- रोहितचे ट्‌वेंटी-20 मधील चौथे शतक, भारतीयांत आघाडीवर. वनडेतील द्विशतकातही रोहित भारतीयांत अव्वल. 
- जागतिक ट्‌वेंटी-20 मध्ये एका डावातील पन्नासपेक्षा जास्त धावांच्या क्रमवारीत रोहित (19) अव्वल, विराटला (18) मागे टाकले. 
- ट्‌वेंटी-20 मध्ये रोहितचे 92 षटकार, ख्रिस गेल आणि मार्टिन गुप्टील (103) आघाडीवर 
- ट्‌वेटी-20 लढत होत असलेले अटलबिहारी वाजपेयी मैदान हे भारतातील विसावे, तर क्रिकेट जगतातील 102 वे.

Web Title: india wins second T20 against west indies