भारतीय महिलांचा सलामीला जपानविरुद्ध सहज विजय 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

कोणत्याही स्पर्धेतील सलामीच्या लढतीतील विजय खूपच मोलाचा असतो. राणीच्या अनुपस्थितीत आक्रमकांवरील जबाबदारी वाढली होती. आम्ही ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. या स्पर्धेतील विजेतेपद विश्‍वकरंडकाच्या दिशेने मोलाचे ठरेल. 
- नवनीत कौर 

मुंबई - भारतीय महिलांनी आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सलामीला जपानचे आव्हान 4-1 असे सहज परतविले. नवनीत कौरची चमकदार हॅटट्रिक, तसेच सविताच्या भक्कम गोलरक्षणामुळे गतविजेत्या भारताचा विजय सुकर झाला. 

कोरियातील दॉंघी सिटी येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत गतविजेत्या भारताने सुरवातीपासून हुकमत राखली. नवनीतने सातव्या, 25 व्या आणि 55 व्या मिनिटास गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. तिला अनुपा बार्लाच्या (53) एका गोलची साथ लाभली. वेगवान खेळ करणाऱ्या भारताने चेंडूवर चांगली हुकमतही राखली. सुनीता लाक्रा आणि सविताच्या चांगल्या बचावात्मक खेळामुळे जपानला प्रतिआक्रमणाची फारशी संधीही लाभली नाही. 

नवनीतच्या पहिल्या दोनही गोलांत वंदना कटारियाची निर्णायक कामगिरी होती. तिच्या वेगवान धडाकेबाज चालीमुळे जपानी बचावाचे लक्ष तिच्यावर केंद्रित झाले. वंदनाने मोक्‍याच्या वेळी नवनीतकडे चेंडू पास केले होते आणि नवनीतने संधी साधली. तिसऱ्या सत्रात आलेल्या पावसाने भारताच्या खेळाची लय काहीशी बिघडली. भारताने दोन पेनल्टी कॉर्नर दवडले. प्रतिआक्रमणात जपानने तीन पेनल्टी कॉर्नर मिळविले, पण ते सविताला चकविण्यास अपयशी ठरले. नवनीतचा चौथा गोल भारतीयांची ताकद दाखविणारा होता. जपानचा पेनल्टी कॉर्नर अपयशी ठरवत भारतीयांनी प्रतिआक्रमण रचले. उदिता आणि नवनीतने जपानी बचावपटूंना सहज चकविले. गोलक्षेत्रात दोघींनी एकमेकांकडे पास दिला होता. त्यातही नवनीतने संधी दिसताच गोल केला होता. 58 व्या मिनिटास जपानने गोल केला, पण तोपर्यंत निकाल स्पष्ट झाला होता. 

कोणत्याही स्पर्धेतील सलामीच्या लढतीतील विजय खूपच मोलाचा असतो. राणीच्या अनुपस्थितीत आक्रमकांवरील जबाबदारी वाढली होती. आम्ही ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. या स्पर्धेतील विजेतेपद विश्‍वकरंडकाच्या दिशेने मोलाचे ठरेल. 
- नवनीत कौर 

Web Title: India women's easy win against Japan